नगर – डॉ. नीलेश शेळके कर्जप्रकरणी नगर अर्बन बॅंकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही शाखांमधील एकूण 4 कर्ज प्रकरणात बॅंकेची 22 कोटी 90 लाखाच्या रकमेचा अपहार झाल्याची ही तक्रार आहे.
दरम्यान, या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी दिले.
केडगाव शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील व मार्केट यार्ड शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी राजेंद्र शांतीलाल लुणियाया दोघांनी 7 मार्च रोजी दोन स्वतंत्र तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे दिल्या आहेत.
आता, या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. मार्केट यार्ड शाखेत 5 कोटींचे एक कर्जप्रकरण असून केडगाव शाखेत एकूण तीन कर्जप्रकरण असून 17 कोटी 90 लाखाचे कर्ज घेण्यात आले आहे. या चार कर्जप्रकरणी कर्जदार डॉ. नीलेश शेळके याच्यासह डॉ. भास्कर सिनारे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे, गिरीश अगरवाल यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. बॅंकेच्या केडगाव शाखेतून तीन कर्जप्रकरणे केली असून कर्जदार व जामीनदारांनी तीन प्रकरणे मिळून मशिनरी खरेदीसाठी 17 कोटी 90 लाखाचे कर्ज घेऊन सदर कर्जाच्या रकमेतून मशिनरी न घेता परस्पर कर्जाची रक्कम कर्जदार व जामीनदार यांनी संगमनताने वैयक्तिक फायद्यासाठी वापरून बॅंकेच्या कर्जाच्या रकमेचा अपहार केला.
तसेच बॅंकेची फसवणूक केली, अशी तक्रार प्रदीप पाटील यांनी केली. दुसरी तक्रार राजेंद्र लुणिया यांनी केली असून मार्केट यार्ड शाखेतून 5 कोटीचे कर्जप्रकरण करून कर्जदार व जामीनदारांनी कर्जच्या रकमेचा अपहार केला, असे लुणिया यांनी तक्रारीत म्हटले आहे.