दापोडी – सांगवी-बोपोडी पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या पुलामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्द जोडली जाणार आहे. त्यामुळे सांगवीतील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सेवा रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर सेवा रस्ता देखील पूर्ण होणार असल्याने येथील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
सांगवी-बोपोडी मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुळा नदीवरील हा पूल महत्त्वाचा भूमिका बजाविणार आहे. या मार्गावरील रहदारी वाढल्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण व सेवा रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी बांधित घरमालक व जागा मालकांना भूसंपादन विभागाच्या पिंपरी कार्यालयाने नोटीस दिलेल्या आहेत. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
या पुलामुळे सांगवीतील ममतानगर, प्रियदर्शनीनगर, संगमनगर आदी भाग गजबजणार आहे. तसेच नदीपात्रातील पुलाच्या खांबांचे काम प्रगतिपथावर आहे. त्यादृष्टीने भूसंपादन विभागाकडून येथील भूसंपादन कारवाई प्रस्तावित आहे. याबाबत रहिवाशांच्या हरकती व सूचना यावर कार्यवाही सुरू आहे. सध्या हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, सांगवी येथून पूर्व पुण्याकडे स्टेशन, येरवडा कॅम्प जाणारी सर्व वाहतूक मुळा नदी किनारा रस्ता, विद्यापीठ, औंध रस्ता सांगवी मार्गे जाईल. त्यामुळे सध्याचा वीस ते चाळीस फूट रुंद असलेला रस्ता अपुरा पडणार आहे.