सातारा – सातारा शहरामध्ये होत असलेल्या विकासकामांचे सारे श्रेय हे सातारकरांचे आहे. ही सर्व कामे दर्जेदार झाली पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. ठेकेदाराने ठेकेदाराप्रमाणे काम करावे, कोणाचा चमचा होऊ नये, अशी खरमरीत टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता केली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील विविध विकासकामांची शनिवारी सुमारे दोन तास पाहणी केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, विनीत पाटील, राम हादगे, पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट, अभियंता दिलीप चिद्रे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
या पाहणी सत्रामध्ये उदयनराजेंनी कर्नल संतोष महाडिक स्मारक, अजिंक्यतारा किल्ल्यावरील कॉंक्रीट रस्ता येथील आसन व्यवस्था, संरक्षक भिंत, अजंठा चौक व बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील उड्डाणपुलाच्या अंतर्गत सुशोभीकरण कामे आणि पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत कामांची त्यांनी पाहणी केली. पोवई नाका येथील शिवतीर्थाच्या नूतनीकरण कामाची पाहणी करून ते काम दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या. कर्नल संतोष महाडिक स्मारकासाठीही अडीच कोटी रुपये उपलब्ध झाले असून हे काम लवकरच पूर्णत्वास जाईल असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अजिंक्यतारा किल्ल्या हा मराठा साम्राज्याची तिसरी राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. सातारा ही मराठ्यांची ऐतिहासिक भूमी आहे. ही भूमि कष्ट करणाऱ्या कोणालाही उपाशी राहू देत नाही. या किल्ल्यावर जाण्यासाठी सुरक्षित रस्ता हवा म्हणून डीपीडीसीमधून पाच कोटी आणि पर्यटन विभागाकडून पाच कोटी असा दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 600 मीटर कॉंक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित सहाशे मीटर रस्त्याच्या कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत. हे काम आम्ही आधीच जिल्हा नियोजनकडे प्रस्तावित केले होते. पण काम त्यांच्या ठेकेदाराला मिळाले. हे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा प्रकार आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता लगावला.
विकास कामासंदर्भात बोलताना उदयनराजे पुढे म्हणाले, एक कोटी रुपये खर्च करून सातारा शहराचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी व्हयूविंग गॅलरी केली जाणार आहे. ही सर्व कामे सातारकरांच्या सुविधेसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. या सर्व कामांचे श्रेय सातारकरांचे आहे. त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्टरचे काम करावे. कोणाचा चमचा होऊ नये आणि राजकारणी होण्याचा सुद्धा प्रयत्न करू नये. जेणो काम तेणो भायं, दूजा करे, गोता खाय… असा अप्रत्यक्ष टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणाचे नाव न घेता लगावला आहे. तसेच सर्व कामे दर्जेदार व्हावीत. त्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत.