पुणे – मागील काही दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital) फरार झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याचा शोध पोलीस घेत होते. त्यासाठी पोलीसांची दहा पथके देखील तयार करण्यात आली होती. अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ललित पाटील याला बँगलोरमधून ताब्यात घेतले आहे.पाटील याच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक नव्या चेहऱ्यांची नावे देखील समोर येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे.
“आम्ही पोलिसांना ड्रग्जच्या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याच दरम्यान, मुंबई पोलिसांना नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्याची माहिती मिळाली. त्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली.आता ललित पाटील हातात आला आहे. त्यात एक मोठं ड्रग्जचं (Drug racket) जाळ बाहेर येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
“मला आत्ता काही गोष्टी समजल्या आहेत त्या मी लगेच माध्यमांना सांगू शकत नाही. मी योग्यवेळी सांगेन. पण एवढंच सांगतो की, या कारवाईतून आम्ही एक मोठं ड्रग्जचं जाळं उघड करू: असंही फडणवीस यावेळी म्हणाले. मी पळालो नाही, मला पळवलं आहे या ललित पाटीलच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, “ते सगळंच बाहेर येणार आहे. तसेच बोलणाऱ्या अनेकांची तोंडं देखील बंद होणार आहेत आणि पोलिसांच्या या कारवाईतून एक मोठं जाळं समोर येणार आहे. असा इशारा देखील फडणवीसांनी यावेळी दिला.
यापूर्वी ललित पाटील (Lalit Patil brother) याचा भाऊ भूषण पाटील याला अटक करण्यात आली होती. तसेच त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. तसेच ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. या तपासाप्रकरणी पुणे पोलिसांसह नाशिक पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.