लॉकडाऊनमुळे बॉलीवूड इंडस्ट्रीवर देखील परिणाम झाला आहे. यामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबल्याने निर्माते, सिनेमागृहांचे मालक, चित्रपट प्रदर्शनाच्या प्रक्रियेसाठी लागणारी संपूर्ण टीम हैराण झाली आहे. दरम्यान, बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. अक्षयकुमारचा “लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपटदेखील ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षयकुमारबरोबर कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करत आहे.
“लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा हॉट स्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे राइट्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर 125 कोटींना विकण्यात आले आहेत. या निर्णयाबाबत सुरुवातीला काही वेगवेगळी मतं होती. मात्र, आता चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित करण्यासंदर्भात सर्वांची सहमती आहे. पण यासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या चित्रपटाचे काही काम अद्याप बाकी आहे. याकरिता साधारण एक महिना जाईल. त्यामुळे याचे निर्माते लॉकडाऊन संपण्याची वाट पाहात आहेत. जेणेकरून या सिनेमाचे उर्वरित काम पूर्ण होईल आणि प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात येईल. मुंबईमध्ये करोनाची वाढती भीती लक्षात घेता याठिकाणी तरी लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी शक्यता नाही. परिणामी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.