पुणे, दि. 24 -स्त्री कलाकार किंवा संत परंपरेतील स्त्रियांच्या योगदानाचा आज संशोधनात्मक आढावा घ्यावयाचा झाल्यास त्यांच्या योगदानाविषयी उपलब्ध नसलेल्या नोंदी हा त्यांच्याविषयी करण्यात येणाऱ्या संशोधनातील मोठा अडथळा ठरतो, हे खेदाने नमूद करावेसे वाटते, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मोहन आणि डॉ. नलिनी गुजराथी पुरस्कृत कै. कृष्ण मुकुंद उजळंबकर स्मृती पुरस्कार साधना बहुळकर यांनी लिहिलेल्या आणि राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या “बॉंबे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार’ या पुस्तकास डॉ. ढेरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनिताराजे पवार, नलिनी गुजराथी व मोहन गुजराथी उपस्थित होते. डॉ वर्षा तोडमल आणि डॉ एस. एस. पाटील यांनी परीक्षक म्हणून काम केले.
डॉ. ढेरे म्हणाल्या की, अनेक गुणवान स्त्री कलाकारांच्या कला साधनेत प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे खंड पडला. संगीत क्षेत्रातील घराण्यांच्या परंपरेमुळे या क्षेत्रातील स्त्रियांच्या योगदानाच्या निदान काही नोंदी सापडतात. मात्र चित्रकार स्त्रियांच्या बाबतीत असे झालेले दिसत नाही. या संपूर्ण सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर स्त्री चित्रकारांनी दाखवलेले कर्तृत्व अधिक उजवे ठरते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, सध्या स्कूल आणि परंपरा हे शब्द खूप तुच्छतेने वापरले जातात. परंपरा मोडल्याशिवाय नव्या वाटा निर्माण होत नाहीत. परंपरा मोडल्या तरी चालतील प्रथम त्या समजून घेतल्या पाहिजेत. कारण पूर्वसुरींनी केलेल्या कामामुळेच आपण पुढचे पाहू शकतो. समाजाची जी काही स्थितीगती असते, त्यानुसारच कलेच्या क्षेत्रात निर्मिती होत असते. जीवनाच्या सर्व क्षेत्रात झपाट्याने सपाटीकरण होत असताना एका विशिष्ट क्षेत्रात गुणवत्तेची अपेक्षा करणे चुकीचे आहे.