पुणे, दि. 24 -महापालिकेची मान्यता न घेता शहराच्या अनेक भागांत तसेच व्यावसायिक अस्थापनांच्या समोर “आय लव्ह पुणे’ तसेच अशा प्रकारचे इतर जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. त्यातील काही फलकांना चक्क महापालिकेच्या पथदिव्यांमधून बेकायदा वीज जोडणी घेण्यात आली आहे. असे जाहिरात फलक तातडीने काढण्यात येणार आहेत. याशिवाय महापालिकेच्या विकासनिधीतून करण्यात आलेल्या एकाच कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेले संकल्पनांचे फलकही काढले जाणार आहेत.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश अतिक्रमण आणि बांधकाम निर्मूलन विभागास दिले आहेत. त्यामुळे महापालिकेचा निधीतून फुकटची चमकोगिरी करणाऱ्यांना तसेच शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना चाप लागणार आहे.
गेल्या काही वर्षांत शहरात “आय लव्ह….’ च्या डिजिटल फलकांची धूम आहे. नगरसेवकांकडून वॉर्डस्तरीय निधीचा चुराडा करून जागोजागी फलक उभारण्यात आले आहेत. मात्र, आता त्या सोबतच अनेक इच्छुकांकडून महापालिकेची परवानगी न घेताच स्वखर्चातून असे फलक उभारले आहेत. अनेक ठिकाणी हे फलक पदपथावरच उभारले असून, त्याला वीजजोड पालिकेच्या पथदिव्यांमधून घेण्यात आली. मात्र संकल्पना म्हणून स्वत:ची नावे डिजिटल फलकावर झळकवलेली आहे. असे अनधिकृत फलकही तातडीने काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. याशिवाय महापालिकेच्या बस थांब्यांवरही अनेकांनी पालिकेची परवानगी न घेताच डिजिटल फलक लावले आहेत. विशेष म्हणजे राजकीय पक्षाच्या रंगांचे बसथांबे करून आणि त्यावर डिजिटल फलक झळकवून स्वत:चा प्रचार करण्यात येत आहे.
फुकटात प्रसिद्धीचे फॅड
महापालिकेकडून शहरात विविध विकासकामे केली जातात. विविध वास्तू आणि प्रकल्प उभारले जातात. ही कामे मुख्य खात्यांसह नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतूनही केली जातात. या ठिकाणी त्या-त्या विभागाकडून नामफलक लावले जातात. त्यानंतरही नगरसेवकांकडून संकल्पनेच्या नावाखाली पुन्हा स्वतःची नावे टाकून फलक लावले आहेत. संकल्पनेच्या माध्यमातून पालिकेच्या पैशांतून स्वतःसह पक्षाची, नेत्यांची फुकटात प्रसिद्धी करून घेण्याचे नवीन फॅड आले आहे. एकाच चौकात आणि एकाच वास्तूला पूर्वीचे नामफलक सुस्थितीत असताना पुन्हा चार-चार नामफलक लावण्यात आले आहेत. त्यात भरीस भर म्हणून ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांनीही स्वत:चे फलक लावलेले आहेत. असे फलक तातडीने काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.