कराड – शहरातील दैनंदिन स्वच्छता, नियमित कचरा संकलन व र्ज्ञेंसुशोभीकरणावर दिलेला भर आणि यातच आरोग्य कर्मचाऱ्यांनी झोकून दिलेल्या कामामुळे यावर्षीही कराड नगरपरिषद स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत देशात पुन्हा अव्वल ठरली आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 1 आक्टोंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सातत्य राखत केलेल्या दर्जेदार कमगिरीची चौथ्यांदा दखल घेण्यात आली असून नगरपालिकेचा देशात पुन्हा डंका वाजला आहे. कराडने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान कायम ठेवत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बाजी मारली असून पालिकेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
कराड नगरपालिकेने सलग चार वर्षे आपल्या कामगिरीत सातत्य राखत हे यश संपादन केले आहे. यामध्ये शहरातील स्वच्छता, सुशोभीकरणावर दिलेला भर, मुख्याधिकारी, स्वच्छता, आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेले उत्कृष्ठ काम, या सगळ्याला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद या सगळ्यामुळे पालिकेने यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये देशातील 1 लाख 25 हजार लोकसंख्या नगरपालिका/नगरपरिषदा गटात पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा 1 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यासाठीचे निमंत्रण कराड नगरपालिकेला नुकतेच प्राप्त झाले आहे.कराड पालिकेने शहरातील ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेला सीएसटीपी प्लांट, शहरातील सौंदर्यीकरणासाठी केली जाणारी कलात्मकता, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचर्याचे योग्य नियोजन आदी बाबी स्पर्धेत महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
या स्पर्धेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, अभियंता ए. आर. पवार, पालिकेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांनी सर्वतोपरी योगदान दिल्यानेच पालिकेला हे घवघवीत यश संपादन करता आले आहे.
दिल्ली येथे 29 व 30 सप्टेंबर रोजी देशातील अव्वल ठरलेल्या नगरपालिकांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केलेल्या कलाकृती, तसेच राबविलेल्या उपक्रमांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन केले असून कराड नगरपालिका या प्रदर्शनात भाग घेणार आहे. 2 दिवसांच्या प्रदर्शनानंतर 1 आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या या घवघवीत यशाचा पालिकेतील अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करून मोठा जल्लोष केला. यावेळी नगरपालिका कर्मचारी व पदाधिकारी यांनी रमाकांत डाके यांना पेढे भरून शुभेच्छा दिल्या. तसेच कर्मचाऱ्यांनाही यावेळी पेढे भरवण्यात आले. पालिकेचा या यशाने नागरिकांमध्येही मोठा उत्साह निर्माण झाला असून मुख्याधिकारी, पालिका पदाधिकारी, कर्मचारी यांचे नागरिकांनीही अभिनंदन केले.