पाथर्डी -शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये सुविधांचा प्रचंड अभाव आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे दोन-दोन दिवस डॉक्टर रुग्णांकडे फिरकत नाहीत. रुग्णांना पिण्यासाठी कोमट पाणी तर सोडा स्वच्छतागृहात पाणी नसल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. काही वार्डात तर चक्क लाईट नसल्याने रुग्णांनी स्वखर्चाने दिवे आणून लावले आहेत. अनेक दिवस झाले रुग्णालयाचा परिसर स्वच्छ केला नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कोविड वार्डात अक्षरशः डुकरे, कुत्री व मांजरांचा वावर असतो.
डॉक्टरच वेळेवर उपलब्ध होत नसल्याने कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवी सुरू असून रुग्णांच्या जीवाशी अक्षरशः खेळले जात आहे. रुग्णालय प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने पाहात नसल्याने रुग्णांकडून संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयातील स्वच्छतेचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्यात आला आहे. ठेकेदार ठेका संपल्याचे सांगतो तर ठेकेदारांने नेमलेले स्वच्छता कर्मचारी आम्हाला पगार वेळेवर मिळत नसल्याचे सांगून स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. स्थानिक प्रशासनाचा ठेकेदारावर अंकुश नसल्याने कर्मचारी मनमानी कारभार करत असून या सावळ्या गोंधळाचा रुग्णांना हकनाक त्रास सहन करावा लागतो.
ठेकेदाराचा नेमका काय प्रश्न आहे हे स्थानिक प्रशासनाला माहित नाही. ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांवर कुणाचाच अंकुश नसल्याने हॉस्पिटल कचराकुंडी बनले आहे. याच अस्वच्छ ठिकाणी करोना संशयित रुग्णांची तपासणी केली जाते. रुग्णांना अक्षरशा रांगा लावून उभे केले जाते. कुठलाही सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. त्यामुळे करोना नसणाऱ्यांनाही रुग्णालयातून संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. उपजिल्हा रुग्णालय करोना रुग्णांसाठी सुमारे 100 बेडची व्यवस्था रुग्णांसाठी करण्यात आली आहे. असे असतांना स्वच्छतेचा मोठा अभाव रुग्णालयात आहे.
करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या थर्माकोलच्या प्लेटचा कचरा त्याबरोबर प्लास्टिक, उरलेले अन्न,फळांचे सालपाटे, कॅरीबॅग, पाण्याच्या मोकळ्या बाटल्या तसेच हुंदडणारी डुकरे अन् कुत्री असे विदारक चित्र उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पहावयास मिळते. कोमट पाणी तर सोडा पिण्यासाठी पाण्याच्या विकत बॉटल्स रुग्णांना बाहेरून आणाव्या लागतात.
कोविड रुग्णांच्या रूम तर सोडाच बेडसुद्धा अनेक दिवसांपासून स्वच्छ केले गेलेले नाहीत.
डॉक्टर अन् कर्मचारी आतील मार्गाने कधीतरी येतात मात्र रुग्णांना नाक दाबून याच मार्गाने ये-जा करावी लागते, अशी व्यथा एका रुग्णाने वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीसमोर मांडली. सर्वत्र पसरलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरून साथरोगाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे.अशा वातावरणात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण,रुग्णांचे नातेवाईक यांचा वावर असल्याने त्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
पाथर्डीतील कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभावउपजिल्हा रुग्णालयातील करोना सेंटरची अवस्था वाईट आहे. करोना रुग्णांना सेवा देण्यात आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. रुग्णालयातील एक्स-रे मशीन कायम बंद असते याची चौकशी व्हायला हवी. यासंदर्भात आम्ही पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन रुग्णालयाच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी करणार आहोत.
नासिर शेख तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस