पुणे – लक्ष्मीपूजनासाठी फुले तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी शुक्रवारी मंडई परिसरात गर्दी झाली होती. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी (शनिवार दि. 14 नोव्हेंबर) आहे. प्रथेप्रमाणे शहरातील व्यापारी बांधव वार्षिक व्यवहारांची नोंद करण्यासाठी किर्द, खतावणीचा वापर करतात. रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात किर्द, खतावणी विक्रेते आहेत. येथे खरेदीसाठी व्यापारी बांधवांनी गर्दी केली होती.
लक्ष्मीपूजनासाठी फुले, उस, बोरे, हार, बत्तासे या साहित्याचा वापर केला जातो. मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार चौक परिसरात तात्पुरत्या स्वरुपात पूजा साहित्य, फुले, उस विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. शुक्रवारी सकाळपासून या भागात पूजा साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. सायंकाळनंतर मंडई परिसरातील गर्दी वाढली होती. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. करोनाचे सावट असताना बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले म्हणाले, गेल्या दोन ते तीन दिवसांत फुलांची आवक वाढली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडू, शेवंती, गुलछडी या फुलांच्या मागणीत वाढ होते. झेंडुची आवक सोलापूर, लातूर, सातारा, कर्नाटक परिसरातून झाली. हारांसाठी शेवंती आणि गुलछडीला मागणी वाढली असून दरही चांगले मिळाले आहेत. शेवंती, गुलछडी या फुलांची कर्नाटक तसेच कोकण भागातील व्यापाऱ्यांनी खरेदी केली. घाऊक फूल बाजारात प्रतवारीनुसार प्रतिकिलो झेंडुला 80 ते 120 रुपये दर मिळाला. शेवंतीला 150 ते 200 रुपये तसेच गुलछडीला 500 ते 700 रुपये असा भाव मिळाला. फुलांना चांगला भाव मिळाल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, असे भोसले यांनी सांगितले.
किरकोळ बाजारात झेंडू 150 ते 200 रुपये किलो
लक्ष्मी पूजनासाठी झेंडूला मोठी मागणी असते. हार विक्रेत्यांकडून शेवंती, गुलछडी या फुलांना चांगली मागणी असते. किरकोळ बाजारात प्रतिकिलो झेंडुची विक्री 150 ते 200 रुपये या भावाने झाली. किरकोळ बाजारात एक किलो शेवंतीची विक्री 200 ते 300 रुपये किलो भावाने झाली. किरकोळ बाजारात प्रतिकिलो गुलछडीचे भाव 800 रुपयांपर्यंत पोहोचले होते.