कोरेगांव -कोरेगाव शहरापासून जवळच असणाऱ्या कुमठे गावामध्ये शुक्रवारी (दि. 15) एक व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कुमठे गावासह एक किलोमीटरचा परिसर प्रांताधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले. कुमठे गावासह एक किलोमिटरचा परिसर करोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शनिवारी (दि. 15) सकाळी 9 वाजल्यापासून सील केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगांव शहरापासून जवळच असणाऱ्या कुमठे गावामध्ये एकाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाल्याने कुमठेसहित कोरेगाव तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या कुमठे येथील हा रुग्ण दि. 11 मे रोजी मुंबई येथून भाजीपाल्याच्या गाडीमध्ये शिवथर (ता. सातारा) येथे येऊन थांबल्याचे त्याच्या मोठ्या भावाला समजले. त्या रूग्णाला शिवथर येथून घरी आणण्यासाठी त्याचा भाऊ कुमठे येथून मोटारसायकलने शिवथर येथे गेला. शिवथर येथून या रुग्णाला मोटारसायकलीने कुमठे येथे आणण्यात आले.
गावात प्रवेश करीत असतानाच कुमठे गावच्या ग्रामस्तरीय समितीकडून त्याची चौकशी करून त्याला घरी जाऊ न देता त्याच्यावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्याला क्वारंटाइन करण्यात आले. दरम्यान त्याच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसू लागल्याने दि. 13 रोजी कोरेगांव ग्रामीण रूग्णालयात त्याचा स्त्राव तपासणीसाठी घेऊन त्याची रवानगी ब्रहमपुरी (ता. कोरेगाव) येथील विलगीकरण कक्षात करण्यात आली. शुक्रवारी रात्री त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने हा रूग्ण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कुमठे गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
कुमठे गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रांताधिकारी किर्ती नलवडे, तहसीलदार रोहिणी शिंदे, गट विकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी तातडीने कुमठे गावात जाऊन शनिवारी ग्रामस्थांची बैठक घेतली. चर्चा विनिमय करून करोनाबाधित रुग्ण वास्तव्यास असणाऱ्या विलगीकरण केंद्रस्थानापासून कुमठे गावासह साधारण एक किलोमीटरचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. हा सर्व परिसर शासनाने सील करून प्रतिबधित क्षेत्रात सर्व शासकीय उपाययोजना राबवल्या. कुमठे गावातील सर्व ग्रामस्थांसाठी अत्यावश्यक सेवांचे प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले. ग्रामसेवक, स्वयंसेवकांमार्फत किराणा माल, भाजीपाला, वैद्यकीय सुविधांचे घरपोच वितरण करण्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले.