पिंपरी (प्रतिनिधी) – करोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरतील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. इमारती, गटारे, रस्ते, नाले, पूल व प्रकल्प, उद्याने अशा स्थापत्य विभागातील आठ क्षेत्रीय कार्यालये, बीआरटीएस, स्थापत्य उद्यान, पर्यावरण, पाणीपुरवठा, जलनिसारण विभागातील अशी 105 कामे तातडीने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
लॉकडाउनमुळे शहरातील अनेक विकासकामे ठप्प आहेत. मात्र पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यावर शहरात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. शहराच्या विविध भागात अर्धवट स्थितीतील विकासकामे, आजूबाजूच्या बांधकामांना धोकादायक ठरू शकतील अशी बांधकामे, रस्ते, गटार, नाले, पूल व प्रकल्पासाठी केलेले खोदकाम अशा ठिकाणी पाण साचेल. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन आणखी रोगाचा प्रसार होईल.
या पार्श्वभूमीवर स्थापत्य विभागातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, बीआरटीएस, उद्यान, पर्यावरण, पाणीपुरवठा, जलनिसारण या विभागाअंतर्गत येणाऱ्या विकासकामांबाबतचा आढावा घेऊन पावसाळ्यापूर्वीच कामे करण्यास मान्यता दिली आहे. पावसाळी गटारची अर्धवट कामे, राडारोडा उचलणे, रुग्णालये, महापालिका संदर्भातील कामे, पर्यावरण पाणीपुरवठा विभागातील आवश्यक कामे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही कामे करणाऱ्या मजुरांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.