पिंपरी (प्रतिनिधी) –वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शहरातील चौका चौकात ट्रॅफिक वॉर्डन राबत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षिततेकडे ट्रॅफिक वार्डन पुरवणारी कंपनी, महापालिका प्रशासन आणि पोलीस या तिघांनीही सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वॉर्डन दिले आहेत. शहरात पोलीस बळ खूपच कमी आहे. यामुळे ट्रॅफिक वॉर्डनची वाहतूक पोलिसांना खूपच मोलाची मदत होते. “करोना’च्या या भीषण परिस्थितीत देखील ट्रॅफिक वॉर्डन “करोना योद्धा’ बनून रस्त्यावर उभे आहेत. सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक असणारी सुरक्षा साधने देखील देण्यात आलेली नाहीत.
पिंपरी चिंचवड शहरासह राज्यभरात एक हजाराहून अधिक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. सर्व पोलिसांना शासनाने विमा संरक्षण दिले आहे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेस शिल्ड, हॅंड सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, मास्क यांच्यासह प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या दिल्या आहेत. तसेच पोलिसांची वेळोवळी आरोग्य तपासणी केली जाते. मात्र पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून चौकात उभे असलेल्या ट्रॅफिक वॉर्डनला त्यांच्या ठेकेदाराकडून फक्त तोंडाला बांधण्यासाठी साधे मास्क दिले आहेत. त्यांना विम्यासह इतर कोणतेही साधन उपलब्ध करून दिलेले नाही. त्यांच्या सुरक्षिततेकडे पोलीस प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच संबंधित ठेकेदार यांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वेतनामध्ये कोणत्याही प्रकारची कपात महापालिकेने केलेली नाही हीच त्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणावी लागेल.
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 167 ट्रॅफिक वॉर्डन आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 135 वॉर्डन दिले आहेत. उर्वरित वॉर्डन हिंजवडी आणि चाकण येथील संघटनांनी दिले आहेत. या ट्रॅफिक वॉर्डनचे पगार महापालिका ठेकेदाराला देत आहे. खपूच तटपुंज्या पगारात काम करणाऱ्या या ट्रॅफिक वॉर्डनच्या जीवाची देखील महापालिका प्रशासनाला काळजी असल्याचे दिसून येत नाही. तरीदेखील कोणतीही तक्रार न करता विविध ठिकाणी सुरू नाकाबंदीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून ट्रॅफिक वॉर्डन उभे आहेत.