नवी दिल्ली – भारताचे माजी कर्णधार व महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी मला सातत्याने प्रोत्साहन दिले त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला व कामगिरी देखील सरस झाली, अशा शब्दात डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने कुंबळे यांचे आभार मानले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले तेव्हा कुंबळेंनी मला कोणतेही दडपण न घेण्याचा सल्ला दिला. समोर कोणताही फलंदाज असो त्याला गोलंदाजी करताना त्याच्या देहबोलीचा अभ्यास करायचा व त्याच्या कमकुवत दुव्यांचा पाठपुरावा करायचा. खेळपट्टीकडून काय मदत मिळते याचा अंदाज घेऊनच त्यानुसार गोलंदाजी करायची असा त्यांनी दिलेला सल्ला मला खूपच लाभदायक ठरला, असेही कुलदीपने सांगितले.
पदार्पणातील सामन्यात कुंबळेंनी मला पाच बळी घेण्याचा प्रयत्न कर असे सांगितले होते. अर्थात त्या सामन्यात बळी घेण्यात मला यश मिळाले. कुंबळेंची पाच बळींची अपेक्षा नाही पूर्ण झाली, पण पहिला कसोटी बळी घेण्यात मात्र यश मिळाले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद करण्यात मला यश आले. त्यांच्यासारख्या अनुभवी गोलंदाजांनी दिलेले प्रोत्साहन संपूर्ण कारकिर्दीसाठी कलाटणी देणारे ठरले, असेही कुलदीप म्हणाला.