नवी दिल्ली: मार्च 24 रोजी केंद्र सरकारने देशभरात लॉक डाऊन सुरू केले. 24 मार्च पासून 3 मेपर्यंत लॉक डाऊन चालू असूनही रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये 140 लोक मृत्युमुखी पडले आहेत असेच सेव लाईफ फाउंडेशन या संस्थेने संकलित केलेल्या माहितीत आढळून आले आहे.
लॉक डाऊनच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची वाहतूक चालू होती. या काळातही 600 अपघात होऊन 140 लोकांना आपला जीव गमवावा लागला. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये 30 टक्के हे स्थलांतरित मजुर आहेत. हे मजूर रिकाम्या रस्त्यावरून जात असताना वेगाने जाणाऱ्या वाहनांना त्यांचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला.
जगामध्ये सर्वाधिक जास्त रस्ते अपघाताचे प्रमाण भारतात आहे. भारतामध्ये दरवर्षी सर्वसाधारणपणे 5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये 1 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. लॉक डाऊनच्या काळामध्ये पंजाबमध्ये 42 लोक, केरळमध्ये 26 लोक तर दिल्लीमध्ये 18 लोक अपघातात ठार झाले. आवश्यकतेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्यामुळे लॉक डाऊनच्या काळात हे अपघात झालेले असल्याचे आढळून आले आहे.
ज्या राज्यामध्ये या काळात सर्वात जास्त अपघात झाले, त्यामध्ये पंजाब, केरळ, दिल्लीसह महाराष्ट्र, गुजरात, आसाम, कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. भारतामध्ये रस्ते अपघाताची संख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर स्वयंसेवी संस्था बऱ्याच प्रमाणात प्रयत्न करीत आहेत.
2018 मध्ये रस्ते अपघातांमध्ये 1 लाख 51 हजार लोक मृत्युमुखी पडले. दुर्दैवाची बाब म्हणजे मृत्यू पावणाऱ्यामध्ये 18 ते 45 वयोगटातील जास्त लोक असतात. अपघात झालेल्यांच्या कुटुंबीयांवर यामुळे मोठा परिणाम होतो. 2017 मध्ये रस्ते अपघातात 1 लाख 47 हजार लोक ठार झाले होते. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्यांना कठोर शिक्षा शिक्षेची तरतूद करणारा मोटर व्हेइकल ऍक्ट 1 सप्टेंबर 2019 रोजी अमलात आला. त्यानंतर अपघाताच्या प्रमाणात घट होत आहे. मात्र बऱ्याच राज्यांनी या कायद्यातील तरतुदींना विरोध केलेला आहे.
लॉक डाऊनच्या काळातही रस्ते अपघातात 140 लोक मृत्युमुखी पडले आहेत ही दुर्दैवाची बाब आहे. लॉक डाऊन संपल्यानंतर वाहतुकीचे प्रमाण आणि वेग वाढण्याची शक्यता आहे. यावेळी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज आहे.
पियुष तिवारी,
संस्थापक, सेव लाईफ फाउंडेशन.