बेळगाव: बेळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याबाहेर तैनात करण्यात आलेल्या एका पोलिसाने एसएलआरने स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे.
प्रकाश गुरण्णावर (वय 36) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. ते स्क्रीझोफोनिया मनोव्याधीने त्रस्त होते. मध्यंतरी त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण काही दिवसांपासून त्यांनी औषधे घेणे बंद केले होते, अशी माहिती कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दिली आहे. पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्त सीमा लाटकर, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून बुधवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश हे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते. ते सातत्याने स्मार्ट फोनमध्ये गुंग असायचे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या हातातील अँड्रॉईड मोबाइल काढून घेऊन त्यांना वापरण्यासाठी बेसिक हॅंडसेट दिला होता. त्यामुळे झालेल्या मनस्तापातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. या घटनेची नोंद एपीएमसी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.