पुसेगाव – श्री सेवागिरी महाराजांच्या ७६ व्या पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या श्री सेवागिरी चषक डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निमगाव (अकलूज) संघाचे सर्व गडी बाद करत पुण्याच्या केपी १४ क्रिकेट संघाने श्री सेवागिरी चषक पटकावला.
३ ते ६ जानेवारी दरम्यान यात्रा स्थळावर शासकीय विद्यानिकेतच्या ग्राउंडवर झालेल्या या स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले. दोन गाववाईज, एक तालुकावाईज, एक ओपनहाफ प्रमाणे सामने खेळवले गेले. अनेक राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत कारकीर्द गाजवलेल्या नामांकित खेळाडूंचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता. शिवाय अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठीसुद्धा ही एक सुवर्णसंधी ठरली.
या स्पर्धेत के पी १४ क्रिकेट संघ पुणे (प्रथम), क्रांती ११ क्रिकेट संघ, निमगाव (द्वितीय); श्रीराम इंटरप्रायझेस स्टार सिक्युरिटी क्रिकेट संघ, खेड (तृतीय) तर कोडोली क्रिकेट संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.
विजेत्या संघांना देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज ,ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या हस्ते अनुक्रमे १ लाख ५१ हजार रुपये, १ लाख १ हजार रुपये, ५१ हजार रुपये, २५ हजार रुपये बक्षीस तसेच चषक देऊन गौरविण्यात आले.