पतीच्या हल्ल्यात पत्नी आणि मेव्हणा ठार, राशिवडे येथील धक्कादायक घटना
कोल्हापूर (प्रतिनिधी)- कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे पतीनेच बायको आणि मेहुण्यांवर खुनी हल्ला केला आहे. अडकित्ताच्या सहाय्याने केलेल्या हल्ल्यात वार वर्मी लागल्याने दोघेही गंभीर जखमी झालेत. या दोघा जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.
माजी ग्रामपंचायत सदस्य असलेली पत्नी मांजबाई कावणेकर आणि पती सदाशिव कावणेकर यांच्यात कौटुंबिक वाद होता. त्यातच राशिवडे येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयात आज सकाळी मंदाबाई आणि केरबा उतारे काढण्यासाठी आले होते. याबाबतची माहिती सदाशिवला मिळाली. यावेळी उतारे काढण्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर ग्रामपंचायतीसमोर भरचौकात सदाशिव याने मेहुणा आणि बायकोवर अडकित्ताने सपासप वार केले.
या प्राणघातक हल्ल्यात अतिरक्तस्राव झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी नेताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्यार जप्त केले आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोरच झालेल्या घटनेमुळे राशिवडे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.