कोल्हापूर – शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी काळम्मावाडी जलाशयाजवळ सुरू असलेल्या जॅकवेल आणि इंटेक व्हेलच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. कोव्हीडच्या संसर्गामुळे या कामाला सुमारे सव्वा वर्ष फटका बसला. आता प्राधान्याने कामे करण्याच्या सूचना केल्या असून ही योजना जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण होईल अशी माहिती नामदार सतेज पाटील यांनी दिली. या पहाणीनंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह या योजनेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या.
पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी आज काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामाची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी काळम्मावाडी इथल्या जॅकवेल आणि इंटेक वेलच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे, या प्रकल्प अधिकारी हर्षजीत घाटगे, सल्लागार अभियंता व्ही. एस. नलावडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या पहाणीवेळी नामदार सतेज पाटील यांनी कामाची स्थिती जाणून घेतली. यानंतर या ठिकाणी असलेल्या शासकीय विश्रामगृह इथं काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजना तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग तसेच महावितरण विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी आवश्यक सूचना केल्या. यानंतर पत्रकारांशी बोलतांना नामदार सतेज पाटील यांनी योजनेच्या कामाला कोव्हीडच्या संसर्गामुळे पुरेसे मनुष्यबळ न मिळाल्याने त्याचा फटका या कामाला बसलाय, त्यामुळेच कामाला विलंब झालाय. आज या योजनेच्या सर्व कामांची माहिती घेतली असून उर्वरित कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेतला असल्याचं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं.
काम लवकर पूर्ण करण्यासाठी सध्या सुरू असलेले दोन्ही जॅकवेलचे काम तात्काळ कसे पूर्ण होईल यावर भर देऊन त्याचे नियोजन केलं असल्याचंही नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं. त्याचबरोबर इंटेक वेल आणि इन्स्पेक्शन वेलचही काम केलं जाणार आहे. यापूर्वी ६४६ मीटर कॉपर डॅमची उंची होती मात्र आता दोन मीटरने कॉपर डॅमची उंची वाढवली असून ६४८ मीटरचा कॉपर डॅम करण्यात आलाय. त्यामुळं यावेळी जास्त काळ काम करण्यास मिळणार आहे. या योजनेच्या ५२ किमी पाईपलाईन टाकण्याच्या कामांपैकी ४९ किमी पाईपलाईनचे काम पूर्ण झालंय. तर पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राचे ९५ टक्के काम पूर्ण झालंय.
त्याचबरोबर धरण क्षेत्रातील ४२ टक्के काम पूर्ण झालं असून जॅकवेलच्या दोन राफ्टचे काम शंभर टक्के पूर्ण झालय. सध्या जॅकवेलचे काम आव्हानात्मक असून मनुष्यबळ वाढवून हे काम पूर्ण केले जाणार आहे. तर बिद्री इथल्या महावितरणच्या उपकेंद्रापासून धारणपर्यंत ३३ किलो मीटर अंतराची विद्युत वहिनी टाकण्याचे काम सुरू आहे हे एका महिन्यात पूर्ण होईल.
या योजनेच्या कामाला आवश्यक असलेल्या सर्व मिळाल्या असून आता उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी प्रत्येक आठवड्याला आयुक्तांकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळं जानेवारी २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळं जानेवारी २०२२ पर्यंत काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम पूर्ण होईल अशी माहिती नामदार सतेज पाटील यांनी दिली.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश अबिटकर, आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, प्रकल्प अभियंता हर्षजित घाटगे, सल्लागार अभियंता व्ही. एस. नलावडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, रोहित बांदिवडेकर, उपअभियंता भाग्यश्री पाटील, कल्याणी कालेकर, प्रशांत कांबळे, शाखा अभियंता एच. बी. कुंभार, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, अर्जुन माने, सचिन पाटील, सुनील पाटील, अशपाक आजरेकर, माजी नगरसेविका माधुरी लाड आदी उपस्थित होते.