कोल्हापूर – महावितरणच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयात जनमित्र, बाह्यस्त्रोत, ठेकेदारांचे वीज कर्मचारी यांचे करिता आपत्ती व व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुरक्षा कार्यशाळा संपन्न झाली. महापूराची स्थिती उद्भवल्यास ती कशी हाताळावी याचे प्रशिक्षण दिले गेले. दैनंदिन कामातील सुरक्षा साधनाचे महत्व व विनाअपघात सेवा याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. सुरक्षा विषयक माहितीपटाच्या माध्यमातून वीज कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
कार्यशाळेस कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, कोल्हापूरचे सहाय्यक विद्युत निरीक्षक युवराज वाघ, नीलम पाटील व सिद्धी पोटे यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटन यांच्या सौजन्याने महावितरणच्या इचलकरंजी विभागातील सर्व शाखा कार्यालये व उपकेंद्रासाठी प्रथमोपचार पेटीचे वितरण करण्यात आले. यावेळी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विनीत तोष्णीवाल यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी विभागीय कार्यालयातील गुणवंत कर्मचारी व खेळाडू यांचा गुणगौरव करण्यात आला. कर्नाटकातील म्हैसूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय व्यवसायिक खो-खो स्पर्धेत महावितरणला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. विजयी संघात सहभागी झालेले सुनील कुचेकर, संभाजी जाधव, विनायक गायकवाड, कुस्तीपटू हनुमंत कदम व परिमंडळस्तरीय ऊर्जा पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.