हडपसर – हडपसर उड्डाणपूल आणि मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाच्या आधार खांबांना अवजड वाहने धडकू नये यासाठी रस्त्यावर सिमेंट कॉक्रीटचे संरक्षक दुभाजक टाकण्यात आले आहेत. मात्र, हे वाहतुकीस अडथळा ठरत असून अपघातास निमंत्रण देत आहेत.
हडपसर उड्डाण पुलाला वाहने धडकून काही ठिकाणी तडे गेले होते. त्याची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली आहे. दरम्यान पुन्हा पुलाला वाहने धडकून नुकसान होऊ नये यासाठी पुलाच्या खांबांच्या बाजूला रस्त्यावर सिमेंट कॉक्रीटचे संरक्षक दुभाजक टाकले आहेत. हे दुभाजक अतिशय अशास्त्रीय पध्दतीने टाकण्यात आले आहेत. त्यामुळे हे दुभाजक वाहनांसाठी अडथळा ठरत आहेत. याशिवाय हे दुभाजक वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे वाहने धडकून अपघात घडत आहेत. यात वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. मगरपट्टा चौकातील उड्डाण पुलाच्या खांबांना संरक्षक म्हणून टाकलेल्या दुभाजकांच्या मध्ये कचरा टाकला जातो आहे. याही दुभाजकांना वाहने धडकत आहेत.
“उड्डाणपूलाच्या बीमला मोठी वाहने धडकून पूलाला धक्का बसवू नये म्हणून प्रशासनाने सिमेंटचे डिव्हायडर लावलेले आहेत. या डिव्हायडरमुळे खालील रस्ता छोटा झाला आहे. उड्डाणपूलाला वाहने धडकणे बंद झाले परंतु डिव्हायडर मुळे छोट्या- मोठ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. जे डिव्हायडर बसवले आहेत त्यामध्ये कोणतीही काळजी किंवा खबरदारी घेण्यात आलेली नाही. रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना ते डिव्हायडर नीट दिसत नसल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात तिथेच सुरू झालेले आहेत. प्रशासनाने डिव्हायडर वाहनचालकांच्या लक्षात येईल यासाठी विशिष्ट कलर देऊन किंवा रिप्लेक्टर लावावे जेणेकरून वाहनचालकांना ते डिव्हायडर दिसतील आणि अपघात होणार नाही. प्रशासनाने लवकरात लवकर डीवाईडर ला रिप्लेक्टर बसवण्याची कार्यवाही करावी.”
– महेंद्र बनकर (उपविभागप्रमुख शिवसेना -हडपसर)