कोल्हापूर : गुटखा तस्करीमध्ये सक्रीय असणाऱ्या आंतरराज्यीय एमडी गँगवर मोका अंतर्गत आज कारवाई करण्यात आली. मोका अंतर्गत गुटखा तस्करांवर कोल्हापूर पोलीसांनी कारवाई केल्याची राज्यातील ही पहिली घटना आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.
फिर्यादी चाँदपाशा व त्याचा मित्र नरसिंह मूर्ती टुमकुर (ता. निलमंगला, जि.बेंगलोर) कर्नाटक येथून त्याच्या ताब्यात विमल गुटख्याचे 150 बॅग कंटेनरमध्ये भरुन ते अथणी. जि. बेळगाव येथील गोदामात पोहोच करण्यासाठी घेऊन जात असताना प्रवासामध्ये कंटेनरमधील 150 बॅगपैकी 53 बॅगांची चोरी झालेली होती. ही चोरी चाँदपाशा सनाऊल्ला, त्याचा मित्र नरसिंहमूर्ती व नरसिंहमूर्तीचा मित्र अर्जून (गुन्ह्यातील मयत) याने केल्याचा संशय घेऊन गुटखा तस्करीमध्ये सक्रीय असणाऱ्या एम. डी. गँग या संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख महेश बजरंग दळवी (रा. दानोळी, ता. शिरोळ अटक होणेवर प्रलंबित), संघटित गुन्हेगारी संघटनेचे सदस्य आरोपी शेख जुबेर अहमद (रा. कनडा, कस्तुरी रस्ता, इस्लामपुरा ता. निलमंगला, जि. बेंगलोर कर्नाटक), इम्रान अल्ताफ पाशा (रा. चिकबाणावारा, बेंगलोर कर्नाटक), अशरफ अली उस्मान अली, (रा. उस्माल अली भंडारा रोड, बग्दादीया आखाडा जवळ सतरंजीपुरा, नागपूर), मोहंमद साजिद अब्दूल जब्बार पटणी (रा. नेहरुनगर, कट गेट रोड औरंगाबाद सध्या रा. अप्सरा हॉटेल मिरज), अभिनंदन उर्फ अभ्या राजकुमार पाटील धडेल (रा. कोथळी, ता. शिरोळ अटक होणेवर प्रलंबित), समीर जहांगीर पट्टेकरी (रा. इचलकरंजी अटक होणेवर प्रलंबित), भरतेश सिद्राम कुडचे (रा. नदीवेस मिरज), महंमद जुनैद अब्दूल गफार दिवाण (रा. शांतीनगर, इतवारी नागपूर), रणजित प्रकाश मिसाळ (रा. नदीवेस मिरज) आणि अमर भीमसिंग रजपूत (रा.पटेल चौक शाहूनगर जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांनी फिर्यादी, साक्षीदार व मयत अर्जुन यांना चोरीस गेलेल्या गुटख्याच्या बॅगांची वसुली करण्याकरिता अथनी, मिरज व दानोळी येथे वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवस डांबून ठेऊन वेगवेगळ्या प्राणघातक हत्यारांनी मारहाण करुन, शॉक देऊन शारीरिक छळ केला. त्यात अर्जुन हा मयत झाला.
त्यानंतर एम. डी. गँग या संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख व सदस्य याने पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने प्रेताची अन्य मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. फिर्यादी चाँदपाशा सनाऊल्ला यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांना करण्याबाबत निर्देश दिले होते. गुन्ह्याचा तपास करत असताना गुटखा व्यवसायातील आंतरराज्यीय संघटित गुन्हेगारीचा व संघटित गुन्हेगारी संघटनेच्या आर्थिक लाभातून निर्माण झालेल्या वर्चस्व व हे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी दहशत निर्माण केल्याचा व त्यातून संघटित गुन्हेगारीच्या आर्थिक वर्चस्वास आव्हान देणाऱ्या इसमाच्या खुनाचा प्रकार निष्पण झाला.
त्याचप्रमाणे एम. डी. गँग ह्या आंतरराज्यीय संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख व सदस्याचे विरुध्द कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, शिवाजीनगर, राजारामपुरी पोलीस ठाण्यांसह सांगली जिल्ह्यातील सांगली ग्रामीण, सांगली शहर, मिरज शहर पोलीस ठाण्यांसह नागपूर शहर येथील सतरंजीपुरा पोलीस ठाण्याकडील तसेच अन्न औषध प्रशासनाकडील वेगवेगळे गंभीर व दखलपात्र असे 21 गुन्हे दाखल असल्याचे निष्पण झाले. या गँगवर आंतरराज्यीय गुटखा तस्करी करणाऱ्या संघटीत गुन्हेगारी संघटनेविरूध्द मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.