मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवड भागात आणि मुंबईत कोरोना बाधित 1 रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 41 वर पोहचला आहे. तर देशात 139 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
दुबईहून ५ मार्चला परतलेल्या 64 वर्षीय उच्च रक्तदाबाचा त्रास असलेला हा रुग्ण हिंदूजा रुग्णालयातून संदर्भित करण्यात आला होता. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असल्यामुळे नागरिकात भीती निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहे.
दरम्यान, आज राज्यात आणखी 2 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एक रुग्ण मुंबईचा असून हा 49 वर्षाचा तरुण 7 मार्च रोजी अमेरिकेवरुन परतलेला आहे. तर दुसरा रुग्ण हा पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती असून हा 26 वर्षीय तरुण 14 मार्च रोजी अमेरिकेहून परतलेला आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : पिंपरी चिंचवड मनपा 10, पुणे मनपा 7, मुंबई 7, नागपूर 4, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी 3, आणि रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद येथे प्रत्येकी 1 असे एकूण 41 जण कोरोना बाधित आहेत.
राज्यात आज 105 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण 1,969 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 900 जणांना भरती करण्यात आले आहे.
आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी 779 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनकरता निगेटिव्ह आले आहेत तर 41 जण पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 1169 प्रवाशांपैकी 442 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
दरम्यान, काल आणि आज राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्था नवी दिल्ली येथील तज्ञ पथकाने पुणे येथे भेट देऊन येथील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतला.