कोल्हापुर – उत्तर कोल्हापुर मतदार संघात झालेल्या निवडणुकीच्यावेळी मतदारांना पैसे वाटप केल्या प्रकरणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आम्हीच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडल्याचा दावा भाजपने केला आहे. सोमवारी सायंकाळी शाहूपुरी परिसरात रोख पैसे वाटप करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आम्ही पकडले असा दावा भाजप पदाधिकारी सुनील कदम यांनी केला आहे.
या वृत्ताचा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तातडीने इन्कार केला आहे. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा गैरप्रकारात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याच्या आरोपांचे खंडन केले आणि मतदारांमध्ये पैसे वाटपाची जी काही प्रकरणे उघडकीस आली आहेत, ती भाजप कार्यकर्त्यांवर नोंदवण्यात आली आहेत असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले की, रविवारी कोल्हापुरातील सुतारवाडा भागात भाजपचे दोन कार्यकर्ते मतदारांना रोख रक्कम वाटप करताना आढळले.या दोन भाजप कार्यकर्त्यांकडून 39,530 रुपये रोख जप्त केले आहेत आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसऱ्या एका घटनेत, शाहूपुरी परिसरात भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात काहीं रोकड आढळून आल्याचे शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.या मतदार संघातील निवडणुकीत दिवंगत आमदारांच्या पत्नी जयश्री जाधव या कॉंग्रेसच्या उमेदवार आहेत, तर भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. येथे आज मतदान झाले.