नवी दिल्ली – झारखंडमधील देवघर रोपवे दुर्घटनेच्या बचाव कार्यादरम्यान पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. यावेळी एक महिला बचावकार्य सुरू असताना 1500 फूट खोल दरीत कोसळली. तिला देवघर सदर रुग्णालयात पाठवले असता तिचा मृत्यू झाला. महिला डोंगर दरीत कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ट्रॉलीच्या केबिनमधून उचलत असताना महिला खाली पडली आणि जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. शोभा देवी असे मृत महिलेचे नाव असून त्या देवघर येथील झांसागढी येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिकूट पर्वत रोपवे ट्रॉली क्रमांक ७ मधून हेलिकॉप्टरच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यात येत होते. यादरम्यान एका महिलेला हेलिकॉप्टरमधून सोडलेल्या दोरीच्या सहाय्याने केबिनमधून बाहेर काढण्यात आले. गरुड कमांडोचे सैनिक तिला बाहेर काढत होते. हेलिकॉप्टरमध्ये वरच्या दिशेने नेण्याऐवजी काही कारणास्तव महिलेला खाली उतरवले जात होते.
महिला ज्या दोरीने लटकत होती ती दोरी केबिनमध्ये कुठेतरी अडकली होती. दोरी निघाल्यानंतर जोरदार धक्का बसला आणि महिला खाली डोंगरदरीत कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाला.
Video: रोपवे बचावकार्यात पुन्हा अपघात, 1500 फूट उंचीवरून पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू pic.twitter.com/xWrtQyEwnA
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) April 12, 2022
याआधी सोमवारी बचाव कार्यादरम्यान दुमका येथील रहिवासी युवक हेलिकॉप्टरमधून सुमारे 2000 फूट उंचीवरून खाली पडला होता. त्याचा लगेच मृत्यू झाला होता. यापूर्वी रविवारी दोन महिलांचा मृत्यू झाला होता.