औरंगाबाद: राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्णव कोकणे, सिद्धार्थ मराठे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला. या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकित अर्णव कोकणे याने पाचव्या मानांकित मनन नाथचा 5-3, 4-0 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.
सिद्धार्थ मराठेने आठव्या मानांकित हर्ष राघवचा 4-1, 4-0 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. सहाव्या मानांकित काहिर वारीकने आपला राज्य सहकारी अर्णव पापरकरचा 2-4, 4-0, 4-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.
काल मानांकित खेळाडूंवर विजय मिळविणाऱ्या सार्थ बनसोडेने श्री तम्मा टायब्रेकमध्ये 5-4, 5-4 असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात अमिशी शुक्ला, श्रावणी खवळे, सायना देशपांडे, सोनल पाटील, जिया परेरा, ईरा शहा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.