कोहलीचा असाही विक्रम

रांची: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात माजी कर्णधार महंमद अजरूद्दीन याच्या कामगिरीला मागे टाकले. भारताने आपला पहिला डाव 497 धावांवर घोषित केल्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव 162 धावांत संपविला व त्यांना फॉलोऑन दिला. कर्णधार म्हणून प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन देण्याची कोहलीची ही आठवी वेळ आहे. त्याने माजी कर्णधार महंमद अजरुद्दीनचा विक्रम मागे टाकला.

कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा 51 वा कसोटी सामना आहे. तर अजरुद्दीनने 47 सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. महेंद्रसिंग धोनीने 60 कसोटी सामन्यांत पाच वेळा, तर सौरव गांगुलीने 49 सामन्यांमध्ये चार वेळा प्रतिस्पर्धी संघांना फॉलोऑन दिला होता.

विराट कोहली घेणार विश्रांती
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणे काहीकाळ विश्रांती घेणार आहे. पुढील महिन्यात बांगलादेशविरूद्धच्या मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात येणार असे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिले आहेत. बांगलादेशविरुद्ध 3 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी भारताचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपविण्यात येणार आहे.

ऑक्‍टोबर 2018 पासून कोहलीने बरेच सामने खेळले आहेत, तसेच वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेण्याचा विचार मागे घेत त्याने या मालिकेतही सहभाग घेतला होता, मात्र यंदाच्या मोसमात त्याने 56 पैकी 48 सामन्यांमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे त्याला आगामी महत्वाच्या मालिका डोळ्यासमोर ठेवत विश्रांती देण्याचा मंडळाच्या निवड समितीचा विचार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड येत्या गुरूवारी मुंबईत होणार आहे. आफ्रिका दौऱ्यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. गुरूवारी निवड समिती भारताच्या टी-20 आणि कसोटी संघाची निवड करणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत संघ 3 टी-20 आणि 2 कसोटी सामने खेळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.