फॉलोऑननंतरही दक्षिण आफ्रिकेची वाताहत

पहिला डाव 162, दुसऱ्या डावात 8 बाद 132

रांची: पहिल्या डावातीलच नव्हे तर या दौऱ्यातील अपयशाची मालिका येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही कायम राहिल्यानंतर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा फॉलोऑनच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची याही डावात वाताहत झाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाहुण्यांची दुसऱ्या डावात 8 बाद 132 अशी दयनिय स्थिती झाली असून डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना अजून 203 धावांची गरज आहे.

आज 8 बळी गेल्यामुळे पंचांनी दिवसाचा खेळ अर्धा तासांनी वाढविला होता मात्र तळातील फलंदाजांनी पराभव लांबविला आहे. भारताच्या 497 धावांना उत्तर देण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव महंमद शमी, उमेश यादव, शाहबाज नदिम आणि रवींद्र जडेजा यांच्या अचूक गोलंदाजीसमोर 162 धावांत संपला. यावेळी ते 335 धावांनी पिछाडीवर होते. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्यांच्यावर फॉलोऑन लादला.

एकाच दिवसात 16 बळी –
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीवर या मालिकेने प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. अनुभवी खेळाडुंच्या निवृत्तीनंतर संघबांधनी सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेला हा दौरा पूर्णपणे अपयशाचा ठरला. या सामन्यात तर त्यांनी सोमवारी तिसऱ्या दिवशी एकाच दिवसात 16 बळी गमावले. पहिल्या डावातील 8 आणि दुसऱ्या डावातील 8 असे 16 गडी बाद झाले.

भारतीय गोलंदाजांनी केवळ 57 षटकेच गोलंदाजी केल्याने ते फारसे दमलेले नाहीत हे स्पष्ट झाल्यावर कोहलीने हा निर्णय घेतला. डावाच्या पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी पाहुणा संघ पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला मात्र याही डावात त्यांच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांना कसे तोंड द्यायचे हे समजत नव्हते. शमी आणि यादवचा वेगवान स्विंग गोलंदाजीचा मारा त्यांना खेळताच आला नाही. इतकी वर्षे भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर नांगी टाकताना परदेशी संघांना पाहिले आहे, यावेळी मात्र गेल्या दोन मोसमांपासून संघातील वेगवान गोलंदाजदेखील जागतिक फलंदाजी उद्‌ध्वस्त करताना पाहुन चाहते देखील आनंदी झाले आहेत.

रविवारच्या 2 बाद 9 धावांवरून पुढे सुरूवात केल्यानंतर उमेश यादवने कर्णधार फाफ डुप्लेसीचा त्रिफळा उडविला व त्यांची अवस्था 3 बाद 16 अशी बिकट केली. त्यानंतर पहिलीच कसोटी खेळणाऱ्या झुबेर हमजाने पहिले अर्धशतक पूर्ण करताना थेंबा बवुमासह चौथ्या गड्यासाठी 91 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचे प्रयत्न केले मात्र भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा या जोडीला बाद करत सामन्यावर नियंत्रण मिळविले. हे दोघे पाठोपाठ बाद झाल्यानंतर मात्र त्यांच्या एकाही फलंजदाजाला डाव सावरता आला नाही. केवळ काही तासांतच त्यांचा पहिला डाव 162 धावांवर संपुष्टात आला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्यांच्यावर फॉलोऑन लादला.

बदली खेळाडू
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डिन एल्गरला उमेश यादवच्या उसळत्या चेंडुमुळे दुखापत झाल्याने त्याच्या जागी थेंबा बवुमा फलंदाजीसाठी आला तोदेखील अल्गरचा बदली खेळाडू म्हणुन. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याबाबत केलेल्या नव्या नियमानुसार हा बदल झाला. भारतीय यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या जागी देखील ऋषभ पंत याला बदली यष्टिरक्षक म्हणून मैदानात यायला परवानगी मिळाली. दुसऱ्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने टाकलेला चेंडू उसळी घेत एल्गरच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर एल्गर जमिनीवर कोसळला. या घटनेमुळे एल्गरला मैदानातून बाहेर जावे लागले. तसेच त्याला सामन्यातूनही माघार घ्यावी लागली. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे मात्र अद्याप समजलेले नाही.

भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांना बाद करताना आपले वर्चस्व राखले. फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरल्यानंतर देखील त्यांची वाताहत झाली. वेगवान गोलंदाज महंमद शमी आणि उमेश यादव यांनी पाहुण्यांच्या फलंदाजीला सुरुंग लावला. कर्णधार डुप्लेसीसह प्रमुख फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आले. तळातील फलंदाजांनी भारताचा पराभव लांबविला. थेंबा बवुमा. जॉर्ज लिंडे व डेन पेड्‌ट यांनी दुहेरी धावा करत थोडीफार लढत दिली. याही डावात पुन्हा एकदा शमी आणि उमेश यादव यांनी पाहुण्यांच्या फलंदाजीवर राज्य केले.

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा हाराकिरी पत्करली. ठरावीक अंतराने त्यांचे ग़डी बाद झाले. महंमद शमी आणि उमेश यादव यांनी भारताला विजयाच्या समिप नेले. त्यांचे 8 गडी बाद झाल्यानंतर दोन्ही पंचांनी चर्चा करुन दिवसाचा खेळ अर्धा तासांनी वाढविला की जेणेकरून आजच निकाल मिळेल मात्र तळातील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची परीक्षा पाहिली व पराभव उद्यापर्यंत लांबविला.

विशाखापट्टणम आणि पुणे येथील सामने जिंकत भारताने ही मालिका तर याआधीच जिंकलेली आहे. आता पुन्हा एकदा भारताला डावाने विजय मिळणार हे स्पष्ट झाले आहे. खेळ थांबला तेव्हा पाहुण्यांच्या 8 बाद 132 धावा झाल्या असुन थेओनिस ब्रुयॉन 30 तर अनरीच नॉर्जे 5 धावांवर खेळत आहेत. उद्या मंगळवारी सामन्याचा चौथा दिवस असून कोहलीचा संघ डावाने विजय मिळविण्याच्या उंबरठ्यावर आहे. उद्या पाहुण्यांचा डावाने पराभव झाला तर तो या मालिकेतील दुसरा डावाने पराभव असेल. त्यांची या मालिकेइतकी नाचक्की या आधीच्या एकाही दौर्यात झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.