#AUSvIND : कोहलीने गोलंदाजांवर फोडले खापर

सिडनी  – एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यातही पराभूत झाल्यानंतर मालिकाही गमावलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहली याने गोलंदाजांवर खापर फोडले आहे. कोहलीसह प्रमुख फलंदाजांना आलेल्या अपयशावर मात्र, त्याने चूप्पी साधली असून गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळेच ही मालिका गमवावी लागल्याचेही कोहलीने म्हटले आहे.

या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियाने त्रिशतकी धावसंख्या उभारली होती. व त्याचा पाठलाग करताना पहिल्या सामन्यात भारताला 66 धावांनी तर, दुसऱ्या सामन्यात 51 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. आता या दोन सलग पराभवांमुळे भाताने ही मालिका गमावली असून त्यावर बोलताना कोहलीने स्वतःसह अन्य फलंदाजांच्या अपयशावर पांघरूण घालताना गोलंदाजांवर सडकून टीका केली आहे.

या दोन्ही सामन्यात आमच्या गोलंदाजांनी दिशाहीन गोलंदाजी केल्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा काम सोपे झाले. आम्ही ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक फलंदाजासाठी योजना तयार केली होती. मात्र, त्यानुसार गोलंदाजीच केली नाही. क्षेत्ररक्षकांनीही बेजबाबदार कामगिरी केली. आम्ही काही महत्त्वाचे झेल सोडले, तसेच काही फलंदाजांना धावबाद करण्याची संधीही सोडली, त्यामुळेच त्यांनी त्रिशतकी धावांचे आव्हान ठेवले. त्याचा पाठलाग करतानाही चांगली सलामी मिळाल्यावर त्यात सातत्य राखता आले नाही. संघातील फलंदाजांनी प्रयत्न निश्‍चितच केले मात्र, आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणे शक्‍य झाले नाही. मुळातच गोलंदाजांनी जर योजनेनूसार गोलंदाजी केली असती तर त्यांना मोठी धावसंख्या उभारताच आलीा नसती, असेही कोहली म्हणाला.

मयंक आग्रवाल, श्रेयस अय्यर या खेळाडूंचा अनुभव कमी पडत आहे. त्यांच्या कारकिर्दीची ही सुरूवात असून ते लवकरच या पराभवांतून बोध घेतील. मात्र, संघातील गोलंदाज तर अनुभवी आहेत. त्यांनी गेल्या दोन मोसमांपासून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

आशिया खंडातील पाटा खेळपट्टीवरही अचूक गोलंदाजी करण्याची त्यांची क्षमता आहे पण त्यांना ऑस्ट्रेलियातील वेगवान व गोलंदाजांना मदत करत असलेल्या खेळपट्ट्यांवरही चांगली कामगिरी करता आली नाही. जर त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखले असते तर आम्हाला या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला नसता, असेही कोहलीने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.