पुणे पालिका वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर दाखल

पुणे  – अवघ्या 15 दिवसांत राज्य शासनाच्या सर्व मान्यता मिळवत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव महापालिकेने अखेर राष्ट्रीय वैद्यक परिषदेकडे (नॅशनल मेडिकल कौन्सिल) दाखल केला आहे. हा प्रस्ताव दाखल करण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अखेरची मुदत होती. करोनामुळे केंद्राने हे प्रस्ताव दाखल करण्यासाठी ही मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवून दिली होती. मात्र, त्यापूर्वीच महापालिकेचा प्रस्ताव दाखल झाला आहे.

 

 

परिषदेच्या अंतिम मान्यतेपूर्वी परिषदेची समिती जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये पुण्यात येणार असून त्यासाठीची आवश्यक तयारीचे काम सुरू करण्यात आल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. महापौर मुरलीधर मोहोळ गेली तीन वर्षे या महाविद्यालयासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून, करोनाकाळात महापालिकेस या महाविद्यालयाची गरज अधोरेखित झाली आहे.

 

 

त्यामुळे पालिका प्रशासनाने या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी वेगाने हालचाली केल्या आहेत. त्यासाठी राज्यशासन आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मान्यता अवघ्या 15 दिवसांत महापालिकेने मिळवल्या. तर हा प्रस्ताव 30 नोव्हेंबरपूर्वी केंद्राकडे जाणे अनिवार्य असल्याने प्रशासनाने केंद्राकडे प्रस्ताव सादर होण्यास उशीर झाल्यास खबरदारीचा भाग म्हणून प्रस्ताव सादर करण्याची मुदतही मागितली होती.

 

 

वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव अखेर दाखल झाल्याने हा दिवस शहरासाठी मैलाचा दगड ठरला आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय शहराची आरोग्य सेवा आणखी सक्षम करणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय सुरू होईल.

– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.