खेड – कर्जत ते खेड या राज्यमार्गावर रस्ताचा दर्जा तपासणीसाठी जेसीबी मशीनच्या सहाय्याने राज्यमार्गालगत ठराविक अंतरावर अनेक मोठ-मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे खड्डे गेली पंधरा दिवसांपासून खोदून ठेवण्यात आले असून संबंधित विभागाकडून पाच दिवसांपूर्वीच तपासणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. तरीही इतका हलगर्जीपणा कशासाठी हा सवाल वाहनचालक व प्रवासी करत आहेत.
सध्या हा राज्यमार्ग रहदारीने गजबजलेला आहे. हजारो वाहने या रस्त्यावरून जातात. सुसाट असलेल्या या राज्यमार्गावर अनेकांना वेगाचा अंदाज येत नसल्याने अपघातांच्या मालिकाही थांबता थांबत नाहीत. रस्ता सुरक्षिततेची ही परिस्थिती माहित असताना संबंधित विभागाचा हा बेजबाबदारपणा प्रवाशी व वाहनचालकांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो.
ठेकेदाराने केलेल्या रस्ता कामाची बिले काढण्यासाठी व दर्जा तपासणी करण्यासाठी खोदलेले खड्डे लवकरात लवकर बुजवुन सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करणे अपेक्षित आहे. रस्ता सुरक्षिततेबाबत ठेकेदाराकडून होत असलेली दिरंगाई अनेकांसाठी जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून कारवाईची अपेक्षा आहे.
रस्त्याचा दर्जा तपासून ठेकेदाराला बिले अदा केली जातात. हे खड्डे त्यासाठीच खोदले आहेत.त्याची तपासणीही झाली आहे.संबंधित विभागाला खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्याच्या तत्काळ सूचना देण्यात येतील , असे सहाय्यक अभियंता प्रशांत वाघचौरे (सा.बां.विभाग कर्जत) म्हणाले.