पुणे – केंद्र शासनाच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त महापालिकेकडूनही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत “हर घर तिरंगा’ हा उपक्रमासाठी महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 9 ऑगस्टपासून नागरिकांना मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत जवळपास 48 हजार राष्ट्रध्वजांचे वाटप करण्यात आले असून महापालिकेकडे असलेले राष्ट्रध्वज संपले आहेत.
तर सुरुवातीला 60 हजार राष्ट्रध्वज पुरविण्याऱ्या ठेकेदाराकडून आणखी राष्ट्रध्वज देण्यास असमर्थता दर्शविली असल्याने 5 लाख राष्ट्रध्वजांचे वितरण करण्याचे महापालिकेचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे, महापालिकेने राज्य शासनाला साकडे घातले असून साडेचार लाख राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
या उपक्रमा अंतर्गत महापालिका 5 लाख राष्ट्रध्वज पुणेकरांना उपलब्ध करून देणार होती. त्यात, महापालिका 2 लाख राष्ट्रध्वज खरेदी करणार होती, तर 3 लाख ध्वजांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. त्या, अंतर्गत आतापर्यंत 60 हजार ध्वज उपलब्ध झाले असून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास प्रत्येकी 4 हजार ध्वज पाठविण्यात आले होते. त्यातील जवळपास 12 हजार ध्वज खराब निघाल्याने ते वाटता येणार नाहीत. महापालिकेने राज्य शासनाकडे साडेचार लाख ध्वज तातडीनं उपलब्ध करून देण्याची विनंती केली असल्याची माहिती महापालिकेच्या भांडार विभागाच्या उपायुक्त चेतना केरूरे यांनी दिली.
44 रु.चा ध्वज देण्याची तयारी
एका बाजूला महापालिकेने पॉलिस्टरचे ध्वज ठेकेदाराकडून प्रतीध्वज 27 रूपयांप्रमाणे घेण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने हे ध्वज उपलब्ध करता येणार नसले तरी 44 रुपयांचा सॅटिनच्या कपड्याच्या ध्वज उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शविली आहे. मात्र, महापालिकेच्या नियोजनात हा ध्वज नसल्याचे प्रशासनाने त्यास नकार दिला आहे.