सातारा -सोनगाव कचरा डेपो म्हणजे फक्त कचऱ्याचे ढीग असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा नाही. पण येथील कचरा वेचक संघटनेने हा समज चुकीचा ठरवण्याचे काम सुरू केले आहे. या संघटनेने सामूहिक श्रमदानाने कचरा डेपोच्या पूर्वेला चक्क फळबाग फुलविली असून येथे फुलझाडेही लावली आहेत. सातारा शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसाने सोनगाव कचरा डेपो परिसर वनराजीने नटला आहे.
सातारा पालिकेचा सोनगाव कचरा डेपो म्हणजे कचरा निर्मूलनापेक्षा ट्रायल अँड एरर मेथडचे केंद्र गेल्या काही वर्षात बनला होता.
पुणे मुंबई येथील ठेकेदार शोधून डेपो त्यांच्या हवाली करण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला जात होता. सातारा विकास आघाडीचा महत्वाकांक्षी सहा कोटी रुपयांचा बायोमायनिंग प्रकल्प दोन वर्षापूर्वी राबवण्यात आला. यामध्ये कोणाला किती खत मिळाले हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
सातारा पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या नेतृत्वांर्तगत पालिकेने सोनगाव कचरा डेपोमध्ये सोलर सिस्टिम तसेच मियावाकी गार्डन तयार करण्यात आले आहे. सोनगाव कचरा डेपोची नव्याने ओळख होऊ लागली आहे.
येथील कचरा वेचक संघटनेने सोनगाव कचरा डेपोच्या 17 एकराच्या परिसरात पूर्व दिशेने संरक्षक भिंतीलगत चक्क फळबाग फुलविली आहे. कचरा वेचक संघटनेच्या तीस महिला सदस्यांनी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत भिसे याच्या मार्गदर्शनांर्तगत ही फळबाग फुलविली आहे.
आंबा, पेरू, तसेच लिंबू वर्गीय फळांची चाळीसपेक्षा अधिक झाडे त्यांनी लावली आहेत. तसेच गुलाब व मोगरा या फुलझाडांची लागवड झाली आहे. झाडे वठू नये म्हणून योग्य वेळी छाटणी, सोनखताचा योग्य वापर, पाण्याच्या ठराविक पाळ्या यामुळे झाडांनी आता चांगलाच जोर धरला आहे. कचरावेचक महिलांनी कचरा वेचण्याबरोबर आठवड्यातून आळीपाळीने श्रमदान करून ही झाडे जगविली आहेत. या फळझाडांच्या उत्तम संगोपनामुळे सोनगाव कचरा डेपो एका सुंदर बागेचे रूप घेऊ लागला आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
कचरा डेपोमध्ये वृक्ष लागवडीने होणार
अधिक गुणांकन
फळबाग लागवडीतून मिळणार महसूल
औषधी झाडांच्या लागवडीचे कचरा वेचक संघटनेचे उद्दिष्ट
सोनगाव कचरा डेपोला मिळणार नैसर्गिक संरक्षण
मातीची धूप थांबवण्यास होणार सहाय्य