पुणे -पुण्यात होणाऱ्या “जी20′ साठी 10 जूनपर्यंत शहर सज्ज ठेवण्यात येणार असून, यंदा वेगवेगळ्या “थीम’वर शहरात सजावट केली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने फॉरेन डेलिगेट्सना वारीची सफर करून आणली जाणार आहे.
जून महिन्यात पुण्यात जी 20 परिषदेच्या दोन बैठका होणार आहेत. यातील पहिली बैठक ही माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर तर दुसरी बैठक ही शिक्षण या विषयावर होईल. शिक्षण विषयावर होणाऱ्या बैठकीत सहभागी देशांसह अन्य काही देशांचे प्रतिनिधी आणि मंत्रीदेखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे या बैठकीसाठी विशेष तयारी केली जात आहे.
जी 20 साठी केंद्रीय स्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात नुकतीच विभागीय आयुक्त कार्यालयातही बैठक झाली. त्यानुसार पालिका नियोजन करत आहे, अशी माहिती महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
या परिषदेच्या दरम्यानच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरला प्रस्थानाला निघतात. त्यावेळी त्यांचा मुक्काम पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी असतो, तसा तो पुण्यातही दोन दिवस असतो. या वारीचे मॅनेजमेंट, पालख्या आणि एकूणच वारीचा सोहळा फॉरेन डेलिगेट्सना दाखवला जाणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
यावेळची थीम ही आयटी संबंधित आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, एज्युकेशन, आयटी आणि पालखी या चार थीमशी संबंधित सजावट केली जाणार आहे. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर पाषाण रस्त्यावर एनडीए संबंधित, सोलापूर रस्त्यावर पालखी आणि येरवडा रस्त्यावर विमानाची प्रतिकृती असे काही करता येईल का, याचा विचार सुरू आहे. या संदर्भात बुधवारी दिल्लीतील सचिवांशी बैठक झाली असून, त्यांनीही यासंदर्भात सूचना केल्या आहेत. तयारीचा आराखडा दिल्लीस्थित केंद्रीय प्रशासनच करत आहे, आपण त्याची अंमलबजावणी करत आहोत. त्याच्याव्यतिरिक्त शहर सजावट आपण आपल्या अखत्यारित करणार असल्याचे ढाकणे म्हणाले.
या परिषदेसाठी मगरपट्टा, सोलापूर रस्ता, सेनापती बापट रस्ता (नळस्टॉपपर्यंत), विद्यापीठ रस्ता, नगररस्ता यांची डागडुजी आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
पुण्यात जी 20 परिषदेच्या दोन बैठका
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या मुक्कामी
वारीचे मॅनेजमेंट फॉरेन डेलिगेट्स समजून घेणार
आयटी थीमवर शहरात सजावट
पालखी रस्त्यावर येरवडा येथे विमानाची प्रतिकृती उभारणार
हेरिटेज वॉक, सिंहगड ट्रीपही…
शहराची ओळख करून देण्यासाठी हेरिटेज वॉक आणि सिंहगड ट्रीपही केली जाणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले. याशिवाय शहरात प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळांच्या आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण, फुलांचे डेकोरेशन, रोषणाई, रस्त्यांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी या गोष्टी केल्या जाणार आहेतच.