लोणंद – लोणंद ते निंबोडी रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या तीन चोरटयांनी लोणंदच्या नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांच्यावर चाकूने वार करून गळ्यातील मंगळसूत्र, पर्स, मोबाइल, रोख रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला. सकाळी 9.30 च्या सुमारास घडलेल्या प्रकाराने लोणंदमध्ये खळबळ उडाली आहे.
तृप्ती घाडगे निंबोडी रस्त्यावरील इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये मिटिंगसाठी स्कुटीवरून (एमएच 11 बीजे 9241) निघाल्या होत्या. विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवरील तीन युवकांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांना दोन वेळा ओव्हरटेक करुन निंबोडी रस्त्याच्या चढावर पुढे जाऊन गाडी थांबवली. तिघांपैकी एकाने हातात चाकू घेऊ घाडगे यांना थांबण्यास भाग पाडले. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ओरडू नका म्हणून गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र ओढून घेतले.
गाडीला अडकवलेली मोबाइल, रोख रक्कम असलेली पर्स ओढली. यावेळी त्यांनी प्रतिकार केला. त्यांच्या हातावर चोरट्याने चाकूचा वार करून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा त्यांनी स्कूटीवरून सुमारे 100 मीटर पाठलाग केला. परंतु, यावेळी रस्त्यात कोणीच नसल्याने चोरटे निंबोडी फाटयानजीकच्या रस्त्याने कापडगावच्या दिशेने पळून गेले. घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तृप्ती घाडगे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. लोणंद पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.