केंदूर- पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
पाबळ – ऊसाच्या एफआरपीत वाढ करताना इथेनॉललाही चालना देण्यात येत आहे. त्यामुळे ऊसालाही चांगला दर मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पाबळ येथे 32 वर्षांपर्यंत वाढ होणारी लोकसंख्या गृहीत धरून केंदूर व पाबळ भागातील नागरिकांसाठी केंदूर- पाबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, केंदूर- पाबळ प्रादेशिक योजनेमुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. योजनेचे काम योग्य कालावधीत योजनेचे काम मार्गी लावण्यात येईल. शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा निर्णय, नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम वाढविणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत कर्ज मर्यादेत वाढ असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
खासदार शिंदे म्हणाले की, तब्बल सातशे जीआर निघाले आहेत. कामांचा निपटारा वेगवान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांनीही योजनांची मागणी केली. यावेळी पाबळ ग्रामपंचायतचे सरपंच मारुती शेळके यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उपसरपंच मिराताई नर्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, सुभद्रा बगाटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, मेघना बोर्डीकर, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, पोपटराव गावडे, सुर्यकांत पलांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, कार्यकारी अभियंता एन.एन.भोई, उपअभियंता श्रीकांत राऊत, शाखा अभियंता मिलिंद रोकडे, निर्मला पानसरे, सुभाष उमाप, सविता बगाटे, सरपंच मारुती शेळके, अविनाश साकोरे, अधिकारी-कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
टीका-टिप्पणीला गौण स्थान
कार्यक्रमात भाजप, सेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि आजी- माजी मंत्री उपस्थित होते. मात्र, यावेळी कोणीही राजकीय टीकाटिप्पणी केली नसल्याची बाब उपस्थितांना आश्चर्य चकित करून गेली. चंद्रकांत पाटील यांनी ही योजना प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदृष्टीतून आलेली आहे. स्थानिक कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी अशा योजनांचा पाठपुरावा करीत असतो. दिलीप वळसे पाटील यांचेही योगदान असल्याचे पाटील यांनी उल्लेख केला.
अतिवृष्टीचे पंचनामे होऊन मदत मिळावी तसेच शासकीय मदत फक्त शंभर टक्के पुरवली गेली नाही. ऊस उत्पनात वाढ झाली; मात्र त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली, मनुष्य हानीत वाढ झाली आहे यासाठी माणिक दोष सारखे अजून प्राणी सेंटर निर्माण व्हावी.
– दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री