विवेक वळसे पाटलांचा इशारा : मंचरमध्ये निषेध करीत पुतळा जाळला
मंचर – मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याने त्यांनी माफी मागावी तसेच मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांना राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते फिरून देणार नाही, असा इशारा मंचर येथील शरद सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिला.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्याचा निषेध म्हणून आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्तार यांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री सत्तार यांच्या निषेधाच्या घोषणा देत निषेध केला. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, तालुका अध्यक्षा सुषमाताई शिंदे, शरद बॅंकेचे संचालक अजय घुले, भीमाशंकरचे अंकित जाधव, दादाभाऊशेठ पोखरकर, आनंदराव शिंदे, प्रियाताई बाणखेले, बाळासाहेब थोरात, प्रवीण मोरडे, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले प्रशांत बागल, उद्योजक अजिंक्य वळसे, दीपक पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विवेक वळसे पाटील म्हणाले गेल्या काही दिवसापासून शिंदे सरकार आणि भाजप सरकार मधील मंत्र्यांनी चुकीचे विधाने करून लोकशाहीला काळीबा फासला आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये शिंदे आणि भाजप सरकारच्या मंत्र्यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची प्रतिमा रसातळाला नेली आहे.
संबंधित मंत्री बोलण्यामागे त्यांच्या नेत्याचा हात असल्याचा आरोप शरद सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केला. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, दादाभाऊ पोखरकर, रमेश खिलारी, सुषमा शिंदे याची भाषणे झाली.