Asian Games 2023 ( Men’s javelin throw) : भारतीय भालाफेकपटू किशोर कुमार जेना याने आशियाई क्रीडा स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने बुधवारी (4 ऑक्टोबर) पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. स्टार खेळाडू नीरज चोप्रानंतर किशोरने अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले. नीरज चोप्राने 88.88 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्णपदक पटकावले. तर, किशोर जेनाने 87.54 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने रौप्यपदक जिंकले. जपानच्या गेन्की डीनने 82.68 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह तिसरे स्थान पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील किशोरचे हे पहिलेच पदक आहे. भारतीय भालाफेकपटू किशोर कुमार जेना याचा आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. आठ वर्षांपूर्वी व्हॉलीबॉल सोडून भालाफेकीचा खेळ स्वीकारलेल्या किशोरची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे.
.@Kishore78473748 creates a stir with his shiny #Silver🥈at #AsianGames2022!!
Jena gave his personal best performance with a throw of 87.54 to steal the show!
Many congratulations Jena💪🏻 We are super proud 🤗#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 pic.twitter.com/jpnMF43FXw
— SAI Media (@Media_SAI) October 4, 2023
किशोर जेना याचे घर ओडिशातील पुरी जिल्ह्यातील कोठासाही गावात आहे. सहा बहिणींमधील सर्वात लहान भाऊ किशोर जेना याचे वडील शेतकरी आहेत आणि त्यांच्या वडिलांना सर्व मुलींच्या लग्नासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला मात्र, असे असूनही त्यांनी आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कधीच मागे हटले नाही. किशोर जेनाच्या म्हणण्यानुसार, तो पूर्वी व्हॉलीबॉल खेळत असे. 2015 मध्ये त्याने भालाफेक सूरू केली. भुवनेश्वर येथील स्पोर्ट्स हॉस्टेलमधून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आता तो पटियाला साई सेंटरचा एक भाग आहे. कुटुंबातील कोणीही खेळात गुंतलेले नाही. त्यांचे एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आहे.
2021 मध्ये शेवटच्या वेळी घरी गेलो होतो – किशोर
किशोरने सांगितले की, भालाफेकीच्या तयारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून घरी गेलो नाही. शेवटच्या वेळी 2021 मध्ये किशोर हा घरी गेला होता. तेव्हापासून तो पटियालामधील साई सेंटरमध्ये भालाफेकची तयारी आणि स्पर्धांमध्ये व्यस्त आहे. किशोरच्या मते, ब्रेक घेतल्याने लय तुटते. किशोरने अनेक दिवस त्याच्या पालकांशी संवादही साधला नव्हता. दोघांनाही स्मार्टफोन कसा वापरायचा हे माहीत नाही. त्याची धाकटी बहीण घरी आल्यावर ती आई-वडिलांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधून द्यायची.
प्रथमच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये घेतला होता भाग …
किशोर जेना हा यावर्षी प्रथमच जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर तो पदक जिंकू शकला नाही. जेना पाचव्या स्थानावर राहिला होता. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने ती पोकळी भरून काढली आहे. उच्चस्तरीय स्पर्धेतील जेनाचे हे पहिले पदक आहे. आता त्याची नजर पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकवर आहे.