Bachu Kadu – एकीकडे आम्हाला सत्तेत या म्हणून सांगणार अन् दुसरीकडे काहीही करून बच्चू कडूला (Bachu Kadu) पाडा, असा आदेश द्यायचा हे काही बरोबर नाही, मी बावनकुळेंना सांगतो, एक नाही तर 10 खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही, असा थेट इशारा प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी दिला आहे.
वाशिममध्ये एका दिव्यांग मेळाव्यात मार्गदर्शन करताना बच्चू कडू यांनी भाजपला हा थेट इशाराच दिला. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी त्यांना साथ दिली होती.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू मंत्री होते, शिंदेंनीही त्यांना मंत्रिपद देतो असे आश्वासन दिले होते. पण रखडलेल्या मंत्रिमंडळाच्य विस्तारामुळे बच्चू कडूंना अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही. त्यावर या आधीही बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यानंतर त्यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघातून भाजपने जोरदार तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत अचलपूरचा आमदार हा भाजपचाच असला पाहिजे या दृष्टीने भाजपने गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू केला आहे.
पण बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतरही या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे लपून राहिले आहे.
आपल्या मतदारसंघात कॉंग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. मात्र, भाजपने आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप कडूंनी भाजपवर केला. मात्र, आपण त्याची काळजी करत नसल्याचेही त्यांनी ठणकावले आहे.