मुंबई – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र, नगरसेवक नील सोमय्या यांना काल मुलुंड पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. कारण सोमय्या यांचा पूत्र आणि भाजप नगसेवक नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. नील सोमय्या यांना एका जुन्या प्रकरणात मुलुंड पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. ही चौकशी ४ तास चालू होती.
दरम्यान,नील सोमय्या यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे की, 2020 साली जानेवारी महिन्यात एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने आपल्या दोन टॉवर्सशी निगडीत काम एका खाजगी ठेकेदाराला दिलं होतं. त्यानंतर नील सोमय्या यांच्याशी संबंधित काही लोकांनी ठेकेदाराला ऑफिसमध्ये बोलावून एका टॉवरचं काम त्याच्याकडून काढून घेतलं. परंतु, काही दिवसांनी लोकांनी नील सोमय्या यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा ठेकेदाराला बोलावलं आणि त्याला धमकी दिली.
याप्रकरणी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. अशातच एका वर्षानंतर मुलुंड पोलिसांनी पुन्हा एकदा याप्रकरणी नील सोमय्या यांना समन्स बजावत चौकशीसाठी बोलावलं होतं.