पुणे – भाजपचे नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा पुणे महापालिकेत येणार आहेत. ज्या पायरीवरुन ते पडले, तेथेच त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
मुळीक यांच्यासह भाजप शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मंगळवारी भेट घेतली. सोमय्या यांच्यावरील हल्ला प्रकरणातील शिवसेनेच्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.
मुळीक म्हणाले, “तीन दिवसांपूर्वी सोमय्या यांच्यावर पूर्वनियोजित प्राणघातक हल्ला झाला. आरोपींवर साधी कलमे लावण्यात आल्याने आरोपी मोकाट सुटले आहेत. महाविकास आघाडी सरकारचा पोलिसांवर दबाव आहे. येत्या शुक्रवारी पुन्हा किरीट सोमय्या पुणे मनपात तक्रार देण्यासाठी येतील आणि ज्या पायऱ्यांवर त्यांना धक्काबुक्की झाली, त्याच ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येईल.’