लखनौ – राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होणार आहे. मतदान होणार असलेल्या विधानसभा जागांसाठीच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता थंडावल्या. करोना महासाथीच्या तिसऱ्या लाटेमुळे निवडणूक आयोगाने प्रचारावर अनेक बंधने लादली असल्याने प्रत्यक्ष प्रचारावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून येथे सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ५८ जागांसाठी गुरुवारी (१० फेब्रुवारी) मतदान होणार आहे. यामध्ये शामलीतील तीन, मुझफ्फरनगर -मधील सहा, बागपतमधील तीन, गाझियाबादमधील पाच, हापूरमधील तीन, गौतम बुद्ध नगरमधील तीन, बुलंद शहर, मेरठ आणि अलीगढ येथील प्रत्येकी सात, मथुरेत पाच आणि आग्र्यातील नऊ जागांचा समावेश आहे.
मतदारांना सकाळी ७ ते सायंकाळी ६ या निर्धारित वेळेत मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. करोना महासाथीचा धोका लक्षात घेता सुरक्षिततेचे उपाय योजण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात ५८ विधानसभा जागांवर १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून यासाठी १०७७६ मतदान केंद्रे आणि २५८४९ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ६२३ उमेदवार रिंगणात आहेत ज्यात ५४९ पुरुष, ७३ महिला आणि अन्य एका उमेदवाराचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात २२७८३७३९ मतदार मतदान करतील ज्यात १२३३१२५१ पुरुष, १०४५१०५३ महिला आणि १४३५ इतर आहेत.