मुंबई : ‘आयएनएस विक्रांत’साठी निधी जमा करून त्यात कोट्यवधींचा घोटाळा केल्याच्या आरोपप्रकरणी सत्र न्यायालयाने भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मात्र या प्रकरणाची सुनावणी सुरु होण्याआधीच किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील हे बेपत्ता असल्याचे वृत्त समोर आले. मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच किरीट सोमय्या पहिल्यांदाच समोर आले आहेत. यावेळी त्यांनी आपली बाजू स्पष्ट करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत उलट आरोप लावले आहेत.
किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोमय्या यांनी पोस्ट केलेल्या १ मिनिटं २९ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी २०१३ साली राष्ट्रपतींची भेट घेतल्याची आठवण करुन देत राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच आपण उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणासंदर्भातील सर्व माहिती देणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
10 yrs after symbolic event of BJP #ShivSena‘s SaveVikrant campaign, #SanjayRaut starts 58Cr laundering bogus allegations with no document/proof to divert/stop us.We will not stop exposing scams of ThackeraySarkar! Will approach #MumbaiHighCourt next! @BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/0axOg8J9dF
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 12, 2022
“२०१३ मध्ये डिसेंबर महिन्यात त्यावेळी सत्तेत असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने विक्रांत युद्ध नौकेला ६० कोटींमध्ये भंगारवाल्यांना विकण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीने १० डिसेंबर २०१३ रोजी निधी संकलनाचा एका प्रतिकात्मक कार्यक्रम आयोजित केला. त्यामध्ये ११ हजार रुपये जमा झाले,” असे सोमय्या यांनी निधी संकलनासंदर्भात माहिती देताना व्हिडीओत म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना सोमय्या यांनी, “आज १० वर्षानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सोमय्यांनी यामधून ५८ कोटी रुपये चोरल्याचा आरोप करत आहेत. चार बिल्डर्सच्या मदतीने मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून आपल्या मुलाच्या नावे हे पैसे वळवल्याचा आरोप राऊतांनी केलाय,” असेही म्हटले आहे.
“यापूर्वीही राऊत यांनी दोन महिन्यांमध्ये सात वेळा आरोप लावलेत. पण एकाचाही पुरावा त्यांच्याकडे नाहीय. मुंबई पोलिसांकडे एक कागदही नाहीय यासंदर्भात. तक्रारदार म्हणतोय की संजय राऊतांचं प्रेस स्टेटमेंट घेऊन आम्ही आलोय,” असा टोलाही सोमय्या यांनी या प्रकरणावरुन पुरावे नसल्याचा संदर्भ देत लगावला आहे.
“राऊत साहेब १७ डिसेंबर २०१३ ला जेव्हा आपण राष्ट्रपतींना भेटलो होतो, राज्यपालांकडे गेलो होतो त्यावेळी राष्ट्रपतींना भेटताना शिवसेनेचे मोठे नेते गोपीनाथ मुंडेंसोबत होते. तेव्हा आपण राष्ट्रतींसोबत चर्चा केली होती,” अशी आठवण सोमय्यांनी करुन दिली. व्हिडीओच्या शेवटी, “ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांवर कारवाई होत नाही तोपर्यंत किरीट सोमय्या दबावाला बळी पडणार नाही आणि मागे हटणार नाही. आम्ही उच्च न्यायालयामध्ये सर्व माहिती देऊ,” असे म्हटले आहे.