सणांचा राजा दिवाळी : बलिप्रतिपदा

– विलास पंढरी

दिवाळी म्हणजे आनंदाचा, चैतन्याचा आणि मनातील मरगळ झटकण्याचा सण. यंदा परतीचा पाऊस पाठ सोडायला तयार नाही, आर्थिक मंदीच्या झळा स्पष्ट जाणवणे, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येणे ही या यंदाच्या दिवाळीची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. दीपावली हा भारतातील सगळ्यात मोठा सण. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. हल्ली लाइटच्या माळाही लावल्या जातात. उंच जागी आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात. व्यावसायिकांच्या दृष्टीने दिवाळीला खास महत्त्व असते.

दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते, असे हेमचंद्राने नोंदवले आहे. तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव लिहिलेले आहे. नीलमत पुराणात या सणास दीपमाला असे म्हटले आहे. कनोजचा राजा हर्षवर्धन याने “नागानंद’ नाटकात या सणाला दीपप्रतिपदुत्सव असे म्हटले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथातही दिवाळी हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला दिपालीका म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख सुखरात्रि असा करण्यात आला आहे तर व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात सुख सुप्तिका म्हणून दिवाळी ओळखली जाते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आहे.

दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने किंवा तांदळाने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि “इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्‍यावर घोंगडी घेऊन व एका मडक्‍यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात. ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्‍वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला शुभा असे म्हणतात.

लोककल्याणकारी राजा बळीच्या पूजनाचा हा दिवस आहे. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतात.

कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला वाळणी घालतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळसण म्हणतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी-बैलांना रंग लावून बैलपोळ्याप्रमाणे सजवतात. पाठारे प्रभू लोकांत बळीची अश्‍वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याची प्रथा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)