सेऊल – उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या भगिनी किम यो जोंग यांनी अमेरिकेबरोबर कोणतीही चर्चा करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. चर्चा करण्याची अमेरिकेची अपेक्षा फोल ठरेल. अमेरिकाचा मोठा भ्रमनिरास होईल, असे त्या म्हणाल्या आहेत.
उत्तर कोरियामध्ये सध्या प्रचंड अन्न टंचाई जाणवते आहे. करोनाच्या आपत्तीमुळे तेथील अर्थव्वस्था पूर्ण कोलमडण्याच्या बेतात आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर आण्विक कार्यक्रमांसंदर्भात सुरू असलेली वाटाघाटींची प्रक्रिया खंडीत होण्याची शक्यता आहे, हेच किम यांच्या या वक्तव्यावरून लक्षात येते असे काही तज्ञांनी म्हटले आहे.
आपल्या देशाला संवाद आणि संगर्ष दोन्हींसाठी तयार रहावे लागणार आहे. त्यातल्या त्यात संघर्षासाठीच तयार रहावे लागेल, असे किम जोंग उन गेल्या महिन्यात म्हणाले होते.
त्यानंतर संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची आशा पुन्हा धूसर झाली होती. मात्र किम यांचे हे वक्तव्य म्हणजे एक चांगले संकेत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिवन यांनी म्हटले होते. मात्र सलिवन यांचे म्हणणे मंगळवारी किम यांच्या बहिणीने फेटाळून लावले आणि अमेरिकेबरोबर चर्चेची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.