सेऊल – उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. उत्तर कोरियाने काल लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची तिसरी चाचणी घेतली. त्यानंतर किम यांनी अमेरिकेला ही धमकी दिली. अमेरिकेच्या वाढत्या लष्करी धमक्यांना तोंड देण्याठी अधिक चाचण्या केल्या जातील. थेट अमेरिकेच्या मुख्य भुमीवर मारा करू शकतील, अशा चाचण्या घेतल्या जातील, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने जर चुकीचा निर्णय घेतल्यास उत्तर कोरिया कसे प्रत्युत्तर देऊ शकेल, हे या चाचणीतून दिसले, असे सोमवारी हवॉसॉंग-१८ या क्षेपणास्त्र चाचणीची पहाणी केल्यानंतर त्यांनी सांगितले. शत्रूच्या बेपर्वा आणि बेजबाबदार हालचालींकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. अधिक आक्रमक कृतीचे प्रत्युत्तर दिले गेले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
उत्तर कोरियाने काल चाचणी घेतलेले हवॉसॉंग-१८ हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र घन रुप इंधनावर चालते आणि उत्तर कोरियाचे आतापर्यंतचे सर्वात ताकदवान क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते आहे. या क्षेपणास्त्राची काल तिसरी चाचणी घेण्यात आली. यापूर्वी एप्रिल आणि जुलै महिन्यात पहिल्या दोन चाचण्या झाल्या आहेत.
उत्तर कोरियाच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी दक्षिण कोरियादेखील आपल्या क्षेपणास्त्राची सज्जता वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिकेच्या सहकार्याने आण्विक सामर्थ्य वाढवण्यासाठी दक्षिण कोरिया प्रयत्नशील असणार आहे, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष किम सुक येओल यांनी म्हटले आहे.