- दिवसभरात 194 बाधित
- 485 करोनामुक्त
पिंपरी – गेल्या सव्वा वर्षांपासून करोना शहरात ठाण मांडून बसला आहे. या काळात करोनाने शहरातील 2 लाख 55 हजार 733 नागरिकांना बाधित केले. त्यापैकी 2 लाख 50 हजार 477 नागरिकांनी म्हणजेच शहरातील एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के नागरिकांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंगळवारी दुपारी चार वाजता प्रकाशित केलेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत 194 नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तर 485 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यापैकी केवळ 3 मृत्यू गेल्या गेल्या 24 तासांतील असून उर्वरित मृत्यू आधीच्या असून त्यांची मंगळवारी नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील 4262 नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
लसीकरणालाही आला वेग
गेल्या दोन दिवसांपासून करोना प्रतिबंधक लसीकरणालाही वेग आला आहे. दिवसभरात 11 हजार 323 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत 5 लाख 71 हजार 217 करोना प्रतिबंधक डोस देण्यात आले आहेत.
उपचाराधीन रुग्ण हजाराच्या आत
अनेक दिवसांनंतर शहरातील उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आली आहे. सद्यस्थितीत शहरातील रुग्णालयांमध्ये 721 तर गृहविलगीकरणात 273 रुग्ण असे एकूण 994 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.