सियोल: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांनी सर्वोच्च जनरलला बडतर्फ करत लष्कराला युद्धासाठी तयार राहा, असे आदेश दिले आहेत. त्यासोबतच किम जोंग उन यांनी शस्त्रसाठा वाढवण्याचे आणि सैन्याने सतर्क राहण्याचेही आदेश दिले आहेत.
उत्तर कोरियाचे सरकारी वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी केंद्रीय लष्कर आयोगाची बैठक घेतली तसेच उत्तर कोरियाच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी काय उपाय योजना करता येतील त्यावर बैठकीत सविस्तर चर्चा केली. त्यांनी कुठल्याही शत्रू राष्ट्राचं नाव घेतलं नाही. मात्र लष्कराला सज्ज राहण्याचा इशारा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारी वृत्तवाहिनीने एक फोटोही जारी केला आहे. या फोटोत किम जोंग उन हे दक्षिण कोरियाची राजधानी सियोल आणि त्या शेजारच्या ठिकाणांवर पॉईंट करताना दिसत आहेत. तिथल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाक सु इल यांना जनरल पदावरुन हटवून री योंग गिल यांची नवे जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाक सु इल यांना का हटवण्यात आलं याचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र आता री योंग गिल यांना जनरल करण्यात आल्याने ते संरक्षण मंत्री या पदावर राहणार नाहीत.
एका अहवालानुसार, किम जोंग उन यांनी शस्त्रांची निर्मिती वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. मागच्याच आठवड्यात किम जोंग उन यांनी शस्त्रांच्या कारखान्याचाही दौरा केला. मिसाइल इंजिन, तोफखाने आणि इतर हत्यारं यांचं उत्पादन वाढवा असे आदेश त्यांनी दिले आहेत.युद्धाशी संबंधित सर्व गोष्टींसाठी तयार राहा. तसेच अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज राहा असंही किम जोंग उन यांनी सांगितल्याचे कळत आहे.