नॉर्थ कोरिया : जगातील क्रूर हुकूमशाहांपैकी एक असलेला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा विचित्र नियम लागू करण्यासाठी चर्चेत असतो. अलीकडेच, त्यांचे वडील आणि देशाचे माजी शासक किम जोंग इल यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी देशातील लोकांना 11 दिवस हसणे, मद्यपान करणे, पार्टी करणे, खरेदी करणे इत्यादींवर बंदी घातली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा किम जोंग उन चर्चेत आले आहेत.
उत्तर कोरियाच्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने पूर्वी, म्हणजे 28 डिसेंबर रोजी उत्तर कोरियाच्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय समितीच्या बैठकीदरम्यान एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये किम जोंग-उन खूपच बारीक दिसत होते.
फोटोत त्याच्या चेहऱ्यावर बदल स्पष्ट दिसत होता. फोटोमध्ये किम जोंग-उनचे वजन कमी झाल्याचे दिसत आहे. रिपोर्टनुसार, त्याचे वजन किमान 20 किलो म्हणजेच 44 पौंडांनी कमी झाले आहे. याआधीही तो त्याच्या घटत्या वजनामुळे चर्चेत आला होता.
किम जोंग-उनचे वजन कमी झाल्यामुळे अलीकडेच त्याच्या तब्येतीबद्दल जगभरात चर्चा सुरू झाली होती. याबाबत अधिकाऱ्यांनीही दावा केला आहे की, किम पूर्णपणे निरोगी आहे. त्याचबरोबर पक्षाच्या बैठकीत किम जोंग उन दिसल्यानंतर त्याच्याबाबतच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
उत्तर कोरियामध्ये अन्नाच्या कमतरतेमुळे किम जोंगउनने जेवण कमी केल्याचे सांगितले जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, किम जोंग-उनने आपल्या नागरिकांनाही परिस्थिती सामान्य होईपर्यंत कमी अन्न खाण्याचे आवाहन केले आहे.
ऑक्टोबरमध्ये किम जोंगउनने देशातील नागरिकांना आवाहन केले होते की, जोपर्यंत उत्तर कोरिया 2025 मध्ये चीनसोबतची सीमा पुन्हा उघडत नाही, तोपर्यंत लोकांना कमी अन्न खावे लागेल. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने अंदाज व्यक्त केला आहे की, उत्तर कोरियामध्ये यावर्षी सुमारे 860,000 टन अन्नाची कमतरता आहे.