विद्यानगर, चिंचवड येथील घटना; दोघांना अटक
पिंपरी – काही दिवसांपूर्वी झालेल्या खून प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. पूर्ववैमनस्यातून आरोपी एका तरुणाला मारण्यासाठी हत्यारासह आले होते. ठरल्याप्रमाणे ते त्याला मारू लागले, मात्र एक तरुण भांडणे सोडविण्यासाठी आला आणि आरोपींनी त्यालाच ठार मारले. ही घटना शनिवारी (दि. 22) पहाटे सव्वाबारा वाजता विद्यानगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शंकर गोविंद सुतार (वय 23, रा. हनुमान मंदिरासमोर, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नीला गोविंद सुतार (वय 45) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद ऊर्फ पप्प्या राकेश पवार (वय 21, रा. दत्तनगर, शेलार गल्ली, चिंचवड), अजय ऊर्फ एबी गणेश भिसे (वय 20, रा. दत्तनगर, बुद्ध विहाराचे समोर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी यांचा मुलगा शंकर सुतार हा हनुमान मंदिरासमोर झोपला असताना आरोपी तिथे आले आणि झोपेत असलेल्या शंकर याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच दगडी पाटा डोक्यात मारला.
दरम्यान पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी विनोद आणि अजय या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखी सहा साथीदारांसोबत मिळून शंकर सुतार याचा खून केल्याची कबुली दिली. मयत शंकर याच्या मित्रासोबत आरोपींची भांडणे होती. दरम्यान आरोपी शंकर याच्या मित्राला मारण्यासाठी आले होते. त्याला मारत असताना शंकरने मध्यस्थी करीत आरोपींना तीव्र विरोध केला. त्यामुळे आरोपींनी शंकर यालाच मारले.